कोरोना काळातही वाई अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही : चंद्रकांत काळे

  वाई/दौलतराव पिसाळ : कोरोनाची लाट संपल्यानंतर ‘दि वाई अर्बन’ बँकेचा शताब्दी महोत्सव विविध उपक्रमांनी आयोजित केला जाईल, असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष सी.ए. चंद्रकांत काळे यांनी केले. बँकेच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने वाई अर्बन बँकेच्या परिवारातील प्रमुख मान्यवरांची विचारमंथन बैठक लोकमान्य टिळक ग्रंथसंग्रहालयात पार पडली. यावेळी सी.ए. चंद्रकांत काळे बोलत होते.

  बँकेचे सर्व संचालक, माजी अध्यक्ष, माजी उपाध्यक्ष उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेचा शताब्दी महोत्सव कशा पध्दतीने साजरा करायचा, याबाबत यावेळी उपस्थितांनी आपली मते मांडली. बँकेचे अध्यक्ष सी.ए. चंद्रकांत काळे म्हणाले, मी सुरूवातीस लेखापरिक्षणाच्या निमित्ताने १९८२ सालापासून या बँकेशी जोडलो गेलो. त्यानंतर संचालक मंडळात काम केले. त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहारांची मला व संचालक मंडळाला माहिती आहे.

  २०११ पूर्वी बँक लहान होती. संचालक मंडळाच्या कल्पकतेतून बँकेची चांगली प्रगती झाली आहे. गेली ५-६ वर्षे नोटबंदी, जीएसटी व कोरोना या कारणांमुळे बँकिंग व्यवसाय अडचणीतून जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या कडक धोरणांमुळे सहकारी बँक चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी दरवेळी आपण एनपीए पाच टक्क्यांच्या आत राखलेला आहे.

  बँकेच्या व्यवसायात वाढ झाली असली तरी गेले दीड वर्षे सर्व व्यवसाय बंद असल्याने बँकेच्या व्यवसायावरही परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे बँकेच्या एनपीएमध्ये वाढ झालेली आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्यावर एनपीएमध्ये निश्चितपणाने कमी होईल, अशी खात्री आहे.

  भारतातील १५२३ सहकारी बँकांमधून आर्थिक स्थितीच्या बाबतीत आपल्या बँकेचा ८२ वा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने धोरणे ठरविताना आपल्या बँकेकडूनही सल्ला मागवला आहे. तो एकप्रकारे आपले बँकेचा गौरवच आहे. त्याचप्रमाणे आपल्या बँकेला तीन ऑफसाईट एटीएम सुरू करण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिलेली आहे. देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

  बँकेला मिळतंय चांगलं उत्पन्न

  आपल्या बँकेकडे आता २६ एटीएम आहेत. त्यापासून आपल्याला चांगले आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. आगामी काळात शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने बँकेच्या प्रत्येक शाखेच्या परिसरात ग्राहकांसाठी विविध कार्यक्रम घेण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.

  २०१७ मध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन पुनर्निश्चितीकरण केले आहे. कोविडमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सर्व दिवसांचे वेतन, वार्षिक वेतनवाढ एकाही रूपयाची कपात न करता दिले आहेत, असे सी.ए. चंद्रकांत काळे सांगितले.