यशाला नसतो शार्टकट : जिल्हाधिकारी विक्रम विरकर

जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेतल्याशिवाय कोणतीही पर्याय नाही. यशाला शार्टकट नसतो हे सर्वांनीच लक्षात ठेवूनच परिश्रम घेणे आवश्यक आहे.

    म्हसवड : जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेतल्याशिवाय कोणतीही पर्याय नाही, यशाला शार्टकट नसतो हे सर्वांनीच लक्षात ठेवूनच परिश्रम घेणे आवश्यक असल्याचे मत बिहार राज्यातील पटना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विक्रम विरकर (Vikram Virkar) यांनी व्यक्त केले.

    ते विरकरवाडी ता. माण येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात एनएमएमएस परीक्षा शिष्यवृत्तीधारक व एसएससीमधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समारंभात मार्गदर्शनपर बोलत होते. यावेळी म्हसवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपक बनगर, विद्यमान नगरसेविका मनीषा विरकर, संस्था प्रसिद्धी विभाग प्रमुख लुनेश विरकर आदीसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    कार्यक्रमाची सुरुवात महाराणी देवी अहिल्याबाई होळकर व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले. विक्रम विरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक रिया विरकर या विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचदरम्यान रोटरी क्लब पुणे, सह्याद्री इंडस्ट्रीज व संध्या विरकर, जानकर यांच्या संयुक्त विद्यमाने 90 हजार रुपये किमतीचा एलईडी स्मार्ट टीव्ही विद्यालयास भेट दिल्याबद्दल लुनेश विरकर व संध्या विरकर यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सी. एम. कोकरे यांनी केले. नगरसेविका मनीषा विरकर, संध्या विरकर, लुनेश विरकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. डी. जाधव यांनी केले. तर आभार डी. एस. जावीर यांनी मानले.