सैदापूर येथील घरफोडीप्रकरणी अट्टल चोरट्यास अटक

    सातारा : सैदापूर, ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीचा सातारा डी. बी. पथकाने छडा लावला असून अट्टल चोरटा लोकेश रावसाहेब सुतार वय 27 रा. लिंगणुर ता. मिरज, जि. सांगली यास अटक केली आहे. संशयिताकडून एकूण 4 लाख 80 हजारांचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी, दि. 30 मार्च 2021 रोजी सैदापूर, ता. जि. सातारा येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 4 लाख 82 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत दिलीप दत्तात्रय भोसले रा. राणाप्रतापनगर, सैदापूर, ता. जि. सातारा यांनी तक्रार दिलेली होती.

    घरफोडी झालेनंतर सातारा तालुका डी. बी. पथकातील अधिकारी  कर्मचारी यांनी तांत्रिक तसेच बातमीदारामार्फत गुन्हयाबाबत माहिती प्राप्त करून दोन संशयितांना यापूर्वी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली होती. त्यांचा अन्य एक साथीदार गुन्हा केल्यापासून फरार होता. डी. बी. पथकाने यापूर्वी चोरट्याचा विविध जिल्ह्यामध्ये शोध घेतला होता. परंतु, तो पोलिसांना गुंगारा देत होता. चोरट्याचा दि. 5 जुलै 2021 रोजी पोलिसांनी ताबा घेवून त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी करत असताना चोरट्यावर यापूर्वी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक याठिकाणी सुमारे 25 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे समजून आले. सदरचा युवक घरफोडी करण्यामध्ये सराईत चोरटा असल्याचे समोर आलेले असून तो सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा अशा जिल्ह्यातून तडीपार देखील असल्याचे समोर आले आहे. चोरट्याकडून पोलिसांनी सैदापूर ता.जि. सातारा येथील झालेल्या घरफोडीच्या गुन्हयातील एकूण 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज जप्त करून सदरचा गुन्हा उघडकिस आणलेला आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनखाली पो. नि. सजन हंकारे, पो. उपनिरीक्षक अमित पाटील व सातारा डी. बी. पथकातील पो. हवा. दादा परिहार, पो. हवालदार राजू मुलाणी, पो. ना. सुजीत भोसले, पो. ना. मालोजी चव्हाण, पो. ना. निलेश जाधव, पो. कॉ. सागर निकम, पो. कॉ. सतीश पवार, पो. कॉ. नितीराज थोरात, पो. ना. हेमंत ननावरे, पो. ना. उदयसिंग पावरा यांनी केलेली आहे.