लोणंद येथील ज्वेलर्सच्या दुकानात उद्घाटनाच्या दिवशीच चोरट्यांचा डल्ला; तब्बल ‘इतका’ ऐवज चोरला

    लोणंद : लोणंद ता. खंडाळा येथील लक्ष्मीकांचन प्लाझा या इमारतीत लक्ष्मी गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाचे ९ सप्टेंबरला उद्घाटन झाले. या दुकानाच्या उद्घाटनादिवशीच हातचलाखीने चोरट्यांनी सुमारे १ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र व साखळी लंपास केली.

    सोमवारी (दि.१३) दुकानातील स्टॉक चेक केला असता सोन्याचे काळे मनी असलेले १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, गायब झालेचे लक्षात आले. याबाबत पाहुण्यांकडे चौकशी करूनही या दागिन्यांचा ठावठिकाणा लागला नाही. बुधवारी (दि.१५) सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहताना दुकानाच्या उद्घाटनादिवशी सायंकाळी ५.३४ ते ५.४२ वाजण्याच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत वैभव व विशाल चोपडे यांना बोलण्यात गुंतवून महिला व पुरुष या दोघांनी हातचलाखीने सोन्याचे मनिमंगळसूत्र व साखळी असा १ लाख ८६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन लक्षात आले.

    दरम्यान, याबाबत वैभव चोपडे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर तपास करीत आहेत.