लॉकडाऊनचा चोरट्यांनी घेतला फायदा; सातारा एमआयडीसीत वाढल्या भंगार चोऱ्या

    सातारा : सातारा शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीतील छोट्या व्यावसायिकांनी आपल्या कंपन्या लॉकडाऊनच्या नियमांमुळे बंद ठेवल्या आहेत. त्याचा फायदा प्रतापसिंहनगरातील भंगार चोरट्यांनी घेतला असून, गेल्या दोन महिन्यांच्या काळात अनेक छोट्या कंपन्यांना भंगार चोरट्यांची साडेसाती लागली आहे.

    साताऱ्याच्या एमआयडीसीमध्ये अनेक छोटेमोठे कारखाने आहेत. त्या कारखान्यामध्ये स्थानिक व बाहेरील कामगार काम करतात. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या कंपन्या वगळता इतर कंपन्या बंद आहेत. त्याचाच फायदा प्रतापसिंहनगर येथील भंगार चोरट्यांनी घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अगदी कंपनीच्या कंपाऊंडमध्ये लावलेल्या चंदनाच्या झाडांचीही चोरी झाली. दोन दिवसांपूर्वी फर्निचर कंपनीमध्ये दोन महिलांनी चोरी केली आहे. ही चोरी चक्क भुयार काढून कंपनीत आतमध्ये प्रवेश करुन केल्याचा प्रकार घडला आहे. त्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. तसेच नव्याने आणखी एका कंपनीत चोरीची घटना घडली असून, त्याचीही नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

    अगोदरच साताऱ्याच्या एमआयडीसीमध्ये नवीन व्यावसायिक व्यावसाय सुरु करण्यास तयार होत नाहीत. त्यास कारणेही चोरट्यांचे गृहण, सोयीसुविधांचा अभाव असे आहे. आता तर लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी गेल्यामुळे कंपन्या बंद आहेत. कंपन्यांमध्ये मशिनरी व कच्चा माल आहे. त्या कंपन्यांची जर शटर उचकटून आतमध्ये चोऱ्या होत असतील तर कंपनी मालकांचे अतुट नुकसान होत आहे. त्यामुळे साताऱ्याच्या एमआयडीसीला चोरट्यांपासून वाचवा अशीच आर्त हाक व्यवसायिक मारु लागले आहेत.