युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत; खंडणी घेणारे चार वन संरक्षक अधिकारी पोलिसांच्या रडारवर

युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी संशयित असलेल्या अज्ञात दोघांची नावे बोरगाव पोलिसांनी निष्पन्न केली.गुन्हा दाखल झाल्यापासून वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व महेश ढाणे हे चौघेही बोरगाव पोलिसांना गुंगाराच देत आहेत.

    सातारा: पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी संशयित असलेल्या अज्ञात दोघांची नावे बोरगाव पोलिसांनी निष्पन्न केली.वनसंरक्षक रणजित काकडे व किशोर ढाणे अशी यांची नावे आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरणात वनविभागाचेच चार कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने सातारा वनविभागाच्या अब्रूची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत. हे चौघेही अद्याप फरार आहेत.
    गुन्हा दाखल झाल्यापासून बोरगावचे सपोनि डॉ.सागर वाघ यांनी या प्रकरणी बारकाईने तपास करण्यास सुरुवात केली होती. या खंडणीप्रकरणात वनपाल योगेश गावित व वनसंरक्षक महेश सोनवले याच्यासह अज्ञात दोघांचा समावेश होता.चौफेर तपास करत असतानाच या अज्ञात दोघांची नावे निष्पन्न करण्याचे कामही महत्वाचे होते. त्या दृष्टीने तपास करत असताना बोरगाव पोलिसांना मात्र वनविभागाकडून कोणतेच सहकार्य मिळत नव्हते. मात्र सहायक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ यांनी चिकाटी न सोडता या गुन्ह्यातील अज्ञात दोघांची नावे निष्पन्न केली. वनसंरक्षक रणजित काकडे व किशोर ढाणे हे या गुन्ह्यात सहभागी असल्याने आता वनविभागाचेच चार कर्मचारी या खंडणी प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले आहे.
    गुन्हा दाखल झाल्यापासून वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व महेश ढाणे हे चौघेही बोरगाव पोलिसांना गुंगाराच देत आहेत. त्यांचे मोबाईलची अजूनपर्यंत नॉट रीचेबलच आहेत. बोरगाव पोलिसही या चौघांचा नेटाने तपास करत असून खंडणीप्रकरणात वनविभागाच्याच चार कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने वनविभागाची मात्र पूर्णतः बेअब्रू झाली आहे.