महाबळेश्वरला जाताय? आता गाईडसह मिळणार जंगलची सफर

  महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे चोहोबाजूंनी सदाहरीत घनदाट जंगल आहे हे जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, वन विभागाच्या नियमांमुळे जंगलात जाऊन जंगलची सफर करणे शक्य होत नाही. मात्र, आता ही सुविधा वन विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. जंगलातील राईडची दुरूस्ती करून गाईडसह पर्यटकांना आता जंगलची सफर करून जंगल व जंगलातील प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

  सहायक वन संरक्षक या पदावर काम केलेले महादेव मोहिते यांची नुकतीच सातारा जिल्हयाच्या उप वनसंरक्षक पदी नियुक्ती झाली. त्यांच्या अध्यक्षतेखाली येथील हिरडा विश्रामगृहावर संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती व वन विभागातील विविध अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

  महाबळेश्वर येथील बैठकीत उपस्थित असलेल्या वन समितीच्या सदस्यांनी अनेक मागण्या केल्या. त्यापैकी काही मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. महाबळेश्वर हे राज्यातील नामांकित थंड हवेचे ठिकाण आहे. पर्यटकांवरच हे पर्यटनस्थळ अवलंबून आहे. येथे पर्यटकांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या पॅनेलवर असलेले नागपूर येथील आर्किटेक्ट अशफाक मोहंमद यांनी महाबळेश्वरची पाहणी केलेली आहे. ते काही नवीन योजना सूचवितात का याबाबत यांच्याशी व्हीसीव्दारे चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

  ऑर्थरसीट येथे काचेची प्रेक्षा गॅलरी तयार करता येईल का किंवा परदेशातील धर्तीवर काही नवीन प्रोजेक्ट तयार करता येतो का हे पाहिले जाणार आहे. हेलन पॉईँट, बाॅबिग्टन पाॅंईटसारखे दुर्लक्षित पाॅंईटचा विकास करण्यात येणार आहे. गव्यांचे प्रमाण वाढले आहे. गवे हे मानवी वस्तीत येऊ नये, यासाठी जंगलातच गवताचे कुरण विकसित करून ते त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांसाठी वन पाणवठे तयार करण्यात येणार आहे.

  वन विभागाच्या ताब्यातील शासकीय विश्रामगृहाच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च हा वन समितीच्या वतीने केला जातो. मात्र, त्यांना यापासून काही उत्पन्न मिळत नाही. म्हणून ही सर्व शासकीय विश्रामगृह चालविण्यासाठी वन समितीकडे हस्तांतर करण्यात येणार आहेत. जंगलातील पाउलवाटा व अस्तित्वात असलेले रस्ते यांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी पर्यटकांसाठी टाॅयलेट बांधण्यात येणार आहे. महाबळेश्वर शहर व परिसरात अनेक पॉईंट आहेत.

  गेली दीड ते दोन वर्षे महाबळेश्वर हे लाॅकडाउनमुळे बंद आहे. या काळात वन समित्यांचे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, याच काळात काही पडझड झाली आहे. त्यांची दुरूस्ती तातडीने करण्याची आवश्यक्ता आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे अथवा रेलिंग बांधण्यात येणार आहे. वन विभागाचे अनेक ठिकाणी वाहनतळ आहेत. त्याचे योग्यप्रकारे नियोजन करण्यात येणार आहे.

  लाॅडविक पाॅंईट ते प्रतापगड रोप वे हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आग्रही आहेत. या प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी वन विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे. महाबळेश्वरसाठी जो १०० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे त्यापैकी काही रक्कम ही वन विभागाकडे देखील येणार आहे. त्या रकमेतून पर्यटकांसाठी काही प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे, अशा प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. हे प्रस्ताव लवकरात लवकर राज्य शासनाकडे सादर केले जाणार असल्याची माहितीही उपवन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.

  हिरडा विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीत संयुक्त वन व्यवस्थापन महासमिती यांच्या वतीने अनिल भिलारे यांनी उपवन संरक्षक महादेव मोहिते यांचे स्वागत केले. तर विजय भिलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला वनक्षेत्रपाल दिलीप झगडे, वन व्यवस्थापन समितीचे शांताराम धनावडे, विलास मोरे, पंढरीनाथ लांगी, कादर सयद , नाना वाडेकर , रमेश चोरमले , विष्णु भिलारे , विलास भिलारे , धनंजय केळगणे , संजय केळगणे आदी मान्यवरांसह विविध वन अधिकारी उपस्थित होते