साताऱ्यातील लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी आक्रमक ; शाहूपुरी पोलिसांनी बंद केली दुकाने

ही तर मोगलाई असल्याची शिवेंद्रसिंहराजे यांची प्रतिक्रिया

    सातारा :जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून लागू केलेल्या निर्बंधाच्या विरोधात मंगळवारी व्यापारी आक्रमक झाले . भवानी पेठेतील मोती चौकात काही व्यापाऱ्यांनी हे नियम झुगारत दुकाने उघडण्याचा प्रयत्न करताच शाहूपुरी पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला .

    ऐन सणासुदीच्या तोंडावर पुन्हा कडक नियम लागू झाल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सकाळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मिनी लॉक डाऊनच्या विरोधात आक्षेप नोंदविला .

    जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी सातारा जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करून अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने ब बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत . या बाजारपेठेत मिठाई , बेकरी दुग्धालय , यांना सूट देण्यात आली आहे . जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या या कठोर नियमाच्या विरोधात कापड व्यावसायिक, इतर दुकानदारांची मंगळवारी सकाळीच तीव्र प्रतिक्रिया आली . मोती चौकात राजपथावरील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या निर्बंधांचा निषेध केला . काही दुकानदारांनी सकाळी नऊ वाजताच चक्क दुकाने उघडून प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला . मात्र चौकात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ जाऊन दुकाने बंद केली साताऱ्यात भाजीमंडई वगळता इतर सर्व व्यापारी वर्तुळात प्रचंड शांतता होती . साताऱ्यात बंदचा परिणाम म्हणून रोजची वाहतूक सुध्दा तुरळक च होती . शाळा मंदिरे बाजारपेठा बंद राहिल्याने राजपथ कर्मवीर पथ राधिका रोडवर सकाळपासूनच सामसूम जाणवत होती .

    व्यापारी वर्तुळात वाढती अस्वस्थता

    गुढीपाडवा अवध्या आठवडयावर येऊन ठेपलेला असताना कापड व सराफ बाजार छोटे विक्रेते व्यावसायिक यांच्या व्यवसायावर नियमांची संक्रांत आल्याने व्यापारी वर्गात प्रचंड अस्वस्थता आहे . शनिवारी रविवारी लॉक डाऊन ला आमचा विरोध नाही . कोणी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला दंड करा त्यालाही हरकत नाही मात्र व्यवसाय बंद ठेवल्यास आमचे अर्थार्जन बंद पडणार, आस्थापनांची देखभाल दुरुस्ती कामगारांचे पगार, इतर देणी हे खर्च उत्पन्न च नसल्याने आवाक्याबाहेरच जात आहेत . जिल्हाधिकाऱ्यांनी या नियमांचा फेरविचार करावा अशी आग्रही मागणी सातारा शहर व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे . या संदर्भात व्यापारी संघटनेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे .

    ही तर नियमांची मोगलाई – शिवेंद्र राजे

    साताऱ्याचा व्यापारी वर्ग करोनाच्या दुष्ट चक्रातून सावतोय . त्यामुळे पुन्हा कठोरपणे निर्बंध लादण्याचा प्रकार म्हणजे मोगलाई सुरू असल्याची सणसणीत टीका सातारा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली . ते म्हणाले प्रशासनाने बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली आहे मात्र त्यांना कच्चा माल पुरवणारी दुकाने मात्र बंद आहेत अशा परवानगीचा उपयोग नाही . आठवड्यातून दोन दिवव लॉक डाऊन दंडात्मक कारवाई इतर नियम याला सुध्दा व्यापारी प्रशासनाला सहकार्य करावयास तयार आहेत . ज्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने दुकानात माल भरलाय त्यांनी ऐन सणासुदीत नियम म्हणून दुकाने बंद ठेवायची , हा कसला न्याय जी दुकाने सुरू आहेत तेथे गर्दी झाल्यास करोना संक्रमणाची भीती नाही काय ? मग व्यापारी वर्गाने असे काय केले आहे ? ही तर सरळ सरळ नियमांच्या निमित्ताने केलेली मोगलाई असल्याची टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली .

    सातारा पालिकेच्या पथकाने अंशतः लॉक डाऊन जाहीर असताना मोती चौक ते ५०१ पार टी या दरम्यान दुकाने सुरू ठेवणाऱ्या सात दुकान मालकांना दंड केला . पालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने दुपारी दोन वाजेपर्यंत १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला . सदाशिव पेठेतील मोटार स्टँन्डच्या मंडई परिसरातील भाजीच्या दुकानांसह किरकोळ विक्रेत्यांची दुकाने सुध्दा सर्रास सुरू होती . साताऱ्यात प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरचा व्यापार सक्तीने बंद असला तरी सेवा रस्ते व इतर गल्लीबोळातील दुकानदारांनी दुकानाचे शटर अर्धवट खाली ओढून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता