जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे महाबळेश्वरमधील व्यापारी संतप्त

    महाबळेश्वर : जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली. निवडणुका नेत्यांच्या घरातील लग्न, साखपुडे अशा सोहळयात गर्दी झाली. तर कोरोना पसरत नाही. परंतु दुकानात पर्यटक आले की कोरोनाचा फैलाव होतो, असे जिल्हाधिकाऱ्यांना सिध्द करायचे आहे का? असा संतप्त सवालच या व्यापाऱ्यांनी केला.

    अनेक दिवसांच्या लाॅकडाउननंतर महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे नंदनवन हे पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला या निर्णयानंतर आता कुठे पर्यटकांची आवक शहरात सुरू झाली होती. लहान-मोठे व्यापाऱ्यांना कुठे आता दिलासा मिळण्यास प्रारंभ झाला होता. जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा दर हा 7 ते 9 या दरम्यान स्थिरावला. तो अनेक प्रयत्न करूनही खाली येण्याचे नाव घेत नाही हे पाहून जिल्हाधिकारी यांनी पुन्हा लाॅकडाउनचा निर्णय घेतला. शनिवार, रविवार विकेंडनंतर सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे व्यापारी व इतर व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

    कोरोना रूग्णवाढीचा दर खाली येत नव्हता. तर मग अनलाॅक जाहीर करण्याची घाई जिल्हाधिकारी का केली, जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काय बंद काय चालू याचे चित्र स्पष्ट होत नाही. अधिकारीही काही सांगत नाही. प्रशासनात काम करणारे अधिकारी यांच्यातच सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी व नागरिकांच्या संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. डाॅ. साबने रोडवरील व्यापारी अॅड. संजय जंगम व अतुल सलागरे यांनी व्यापारी बांधवाची बाजू मांडली.

    ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅकडाऊनचा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना वेठीस धरले. जिल्ह्यात सर्वत्र चोरून व्यवसाय केला जात आहे. परंतु शासनाचे कोरोनाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे महाबळेश्वर येथील व्यापारी मात्र गुन्हेगार ठरत आहेत. शासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही कोरोना तपासण्या केल्या. कोरोना लसीचे दोन-दोन डोस घेतले. मास्कचा वापर करून आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आहेत. तरीही प्रशासन आम्हाला वेठीस धरत आहे. हे बरोबर नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा, अशी मागणीही ऍड. संजय जंगम यांनी केली.

    जिल्हाधिकारी यांनी आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा ही मागणी मोठ्या आवाजात जिल्हाधिकारी यांच्या कानावर जावी यासाठी उद्या बाजारपेठेतील व्यापारी यांची एक महत्वाची बैठक येथील हाॅटेल ड्मिलॅण्ड हाॅटेलमध्ये होत आहे या बैठकीला उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांच्यासह सर्व नगरसेवक व्यापारी प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाबाबत एकजुटीने निर्णय घेण्यात येणार आहे.