फलटण तालुक्यातील कोविड सेंटरचे रुपांतर जम्बो कोविड रुग्णालयात करा; सभापती रामराजेंचे निर्देश

  फलटण : सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे काम सध्या सुरु आहे. आगामी काही दिवसांमध्ये फलटण तालुक्यामध्ये सुरु असणाऱ्या कोवि़ड केअर सेंटरचे रूपांतर हे जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
  फलटण येथील “लक्ष्मी – विलास पॅलेस” या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वच यंत्रणा कार्यरत आहे. आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट हि तीव्र स्वरूपाची येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. कोरोनाचा व्हायरस हा म्यूटेट होऊन तिसरी लाट ही तीव्र स्वरूपाची असेल असा ही अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी उपचार मिळावेत म्हणूनच आपल्या सर्वांचे प्रयत्न असणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी सर्व उपचार यंत्रणा उभी करण्याचे काम सध्या सुरु आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनासुद्धा धोका सांगितला आहे, म्हणूनच लहानमुलांसाठी सुद्धा फलटण येथे स्वतंत्र हॉस्पिटल उभे करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
  फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय व लाईफ लाईन हॉस्पिटल येथे ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागामधील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी नुकतेच फलटण तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपचार हे तालुक्याच्याच ठिकाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याचे काम सुरु असल्याची माहिती सुद्धा यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने पावले उचलण्याचे काम सध्या वेगामध्ये सुरु आहे. तरी आपण ज्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने उपाययोजना करीत आहोत. त्या पुरतील का नाही याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. आपण आपल्या बाजूने संपूर्ण तयारी करीत आहोत व वेळप्रसंगी तातडीने पावले उचलून आरोग्य सुविधा बळकट करण्याचे काम आपण सर्व जण करू, अशी ग्वाही सुद्धा यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
  जिल्हाधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद
  साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचे कोरोनाच्या कालावधीमधील कामकाज हे कौतुकास्पद आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह हे सर्व यंत्रणांच्या साहाय्याने कोरोनावर परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व आमदार व पदाधिकारी हे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कोरोनाच्या लढाईस मदत करीत आहेत. कोरोनाच्या लढाईमधून जिल्हाधिकारी शेखर सिंह हे इतर कामकाज सुद्धा व्यवस्थित हाताळत आहेत, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.