घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत जावळीत अल्पवयीन मुलीवर दोन वर्गमित्रांचा बलात्कार

    सातारा : जावळी तालुक्यातील नववीत शिकत असणाऱ्या मुलीला चाकूचा धाक दाखवत दोन वर्गमित्रांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना बालसुधारगृह सातारा येथे पाठवण्यात आले.

    यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील १४ वर्षीय मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्याच वर्गातील दोन मुले या अल्पवयीन मुलीच्या घरी आले. घरात कोणी नसताना पाहून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला व याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील केले. मोबाईलवर केलेला चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा कायमस्वरूपी फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केल्याचे अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली.

    याबाबत संबंधित पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर संबंधित दोन अल्पवयीन मुलांना तात्काळ ताब्यात घेऊन सातारा येथील बालसुधारगृह येथे पाठवण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे व रफिक शेख यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.