केळघर घाटात एसटी कोसळून दोघे जखमी ; पाचशे फूट खोल दरीत डाऊन व्हॅन कोसळली

मेढा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्रमांक (एमएच २० बीएल ०४२९) माणगावहुन कलिंगडे भरून सांगलीकडे चालली होती.

    सातारा  : केळघर घाटातील काळा कडा येथे बुधवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. देवरुख आगाराचे चालक मयूर पावनिकर (वय ४०), रामकिशन केंडे (वय ४२) असे जखमींची नावे आहेत. घटनास्थळी मेढा पोलिस ठाण्याचे सपोनि अमोल माने, महाबळेश्वरचे आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे, स्थानक प्रमुख किरण धुमाळ, कार्यशाळा कर्मचारी महाबळेश्वर आगार, मेढा आगार व्यवस्थापक सुजित घोरपडे यांनी तातडीने भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अपघात झाल्याचे समजताच मुकवली माची येथील प्रकाश खुटेकर, विठ्ठल खुटेकर, सर्जेराव खुटेकर, बाळू खुटेकर, सुनील खुटेकर, रेंगडी येथील भरत कासुर्डे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना दरीतून वर काढले. केळघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोचल्याने जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे खासगी रुग्णालयात दाखल करता आले.

    मेढा पोलिस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी आगाराची मालवाहतूक बस क्रमांक (एमएच २० बीएल ०४२९) माणगावहुन कलिंगडे भरून सांगलीकडे चालली होती. केळघर घाटात ही बस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेंगडी गावच्या हद्दीत काळा कडा येथे एका अवघड वळणावर आली असता चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने व बसवरील नियंत्रण सुटल्याने बस अंदाजे ५०० फूट खोल दरीत कोसळली.

    या अपघातात मालट्रकवर काम करणार्या चालकांपैकी एका चालकाने दरीतून वर येऊन मार्गावरील इतर वाहने थांबून अपघाताची कल्पना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने या चालकांचे प्राण वाचले. यामुळे या चालकांना वेळेत उपचार मिळाले. घटनास्थळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभाग यंत्र अभियंता मोहिते यांनी भेट देऊन अपघाताची सविस्तर माहिती घेतली. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सपोनि अमोल माने करत आहेत.

    सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे

    बुधवारी रात्री चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला आहे. काळा कडा येथे असणार्या या वळणाचा अंदाज नव्याने प्रवास करणार्या वाहन चालकांना येत नाही. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या परिसरात यापूर्वी ही मोठे अपघात झाले असून या अवघड वळणावर अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक कठडे उभारले नाहीत. या ठिकाणी संरक्षक कठडे उभारण्याची आवश्यकता आहे. अजून किती अपघात झाल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येईल असा सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.