साताऱ्यात पुन्हा दुचाकीच्या जाळपोळीचे सत्र; अज्ञाताने पेटविल्या दोन दुचाकी

सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी मंगळवार पेठ, दिव्यनगरी या ठिकाणी गाड्या फोडण्यासह दुचाकी पेटवून देण्याचे प्रकार घडले होते. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला.

    सातारा : सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी मंगळवार पेठ, दिव्यनगरी या ठिकाणी गाड्या फोडण्यासह दुचाकी पेटवून देण्याचे प्रकार घडले होते. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला असून, गुरुवार पेठेतील वृदांवन रेसिडेन्सीच्या पार्किंगमधील दोन दुचाकी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिल्याने त्या जळून खाक झाल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    रविवारी मध्यरात्रीच्या अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. भरवस्तीत असलेल्या गुरुवार पेठेतील वृदांवन रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये दुचाकी, फोर व्हिलर पार्क करुन नागरिक नेहमी प्रमाणे झोपी गेले होते. रेसिडेन्सीचा मुख्य दरवाजाही वॉचमनने बंद करुन टाकला होता. मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी पार्किंगमध्ये असलेल्या दोन दुचाकी पेटवून तेथून पळ काढला.

    दुचाकी पेटल्याचा प्रकार पाहिल्यानंतर रेसिडेन्सीच्या वॉचमनने आरडाओरडा करुन इमारतीतील नागरिकांना जागे केले. पेटलेल्या दुचाकींवर पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे त्याची झळ इतर दुचाकी व मोठ्या गाड्यांना बसली नाही.