वाई तालुक्यातील सहयाद्रीच्या डोंगररांगांना अज्ञाताकडून आगी लावण्याचे प्रकार

गेल्या पंधरा दिवसांपासून वाई तालुक्यातील वन विभागाने वनवे लावू नयेत यासाठी गावोगावी जनजागृती सप्ताह राबविले. त्यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात जंगलाबाबत आस्था निर्माण झाली होती. आणि अनेक गावांतील तरुण वर्ग वनवा रोखण्यासाठी पुढे येताना दिसत होते.

    वाई : वाई तालुक्याच्या चारी बाजुने सहयाद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वाई सारख्या दक्षीण काशीचे शहर वसलेले आहे. या डोंगररांगांमध्ये गेले पंधरा दिवसांपासून डोंगर पायथ्यांशेजारी राहणार्या गावातीलच अज्ञात इसमांकडून वाई तालुक्यातील डोंगररांगांना मोठया प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू झाल्याने येथील वनसंपदा, आर्युवैदिक संपत्ती, पक्षांची घरे, सरपटणारे प्राणी आणि पक्षांची अंडी हे जळून खाक होताना दिसत आहेत. आधिच वाई, आणि भुईंज येथील वनविभागाच्या कर्मचार्यांकडे अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने अज्ञातांनी लावलेल्या या आगी विझविताना त्यांची दमछाक होताना दिसत आहे. तरी वाई तालुक्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी निष्ठूर व धाडसी भूमिका घेवून. माणुसकीला तिलांजली देवून कायद्याच्या चाबकाचा वापर करून वनवा लावणार्यांच्या बरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे, अशी मागणी वाई तालुक्यातील जनतेने केली आहे.

    गेल्या पंधरा दिवसांपासून वाई तालुक्यातील वन विभागाने वनवे लावू नयेत यासाठी गावोगावी जनजागृती सप्ताह राबविले. त्यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात जंगलाबाबत आस्था निर्माण झाली होती. आणि अनेक गावांतील तरुण वर्ग वनवा रोखण्यासाठी पुढे येताना दिसत होते. अनेक गावांचे सरपंच, पोलीस पाटील वनवा लागल्याची वन कर्मचार्यांनी दिलेली हारोळी, व ती विझविण्यासाठी गावोगावच्या वनसमित्या, पोलीस पाटील, सरपंच व तरुण वर्ग असा ताफा वनवा लागलेल्या डोंगरांवर जावून हातात डहाळयांची छकाटी घेवून भर उन्हात. प्राणाची बाजी लावून विझवताना दिसत आहे. वनवा विझविताना वार्याची दिशा कशी बदलेले आणि डोंगर माथ्यावर वाढलेले गवताचे वाळके साम्राज्य जलद गतीने पेट घेत होते. त्यात आग विझविणार्या लोकांपर्यंत त्याच्या झळया बसत होत्या. तरीही आपल्या डोंगरातील निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी हे सर्व तडफडताना दिसत होते. जसा एखादा सैनिक सिमेवर आपल्या प्राणाची बाजी लावून शत्रुशी झुंज देताना दिसतो. प्रसंगी अतिरेक्यांशी सामना करून त्यांचे मुडदे पाडतो. तीच तर्हा आज वाई तालुक्यातील या सहयाद्रीच्या डोंगररांगांची होवून बसली आहे. पावसाळयामध्ये सहयाद्रीच्या याच डोंगररांगांवर हिरवीगार घनदाट झाडीचे वैभव पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातील अनेक पर्यटकांची वाई तालुक्यातील या निसर्गरम्य वातावरणाला भेट देण्यासाठी मोठया प्रमाणावर गर्दी होत असते. येथील सहयाद्रीच्या डोंगरमाथ्यावर डोंगरातील निसर्गाची किंमत देश विदेशातील लोकांना कळते परंतू दुर्दैवाने डोंगर पायथ्याच्या गावातीलच अमानुष प्रवृत्तीच्या काही दुष्ट लोकांना कळत नसल्याने तो गपचूपरित्या डोंगराला जावून आगी लावतो. आणि विझविण्यासाठी धावणार्या माणसांच्या त्या ताफ्याची गंम्मत बघत बसतो. माणसांचा हा ताफा लागलेले वनवे प्रयत्नांची पराकाष्टा करून वनवे विझवितात खरे पण हाच ताफा वनवे लावणार्याला शोधून योग्य शिक्षेसाठी वनविभागाच्या ताब्यात का देत नाही. असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता गावोगावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी व गाव कारभार्यांनी एकत्रीत येवून नुसती गृपवर हारोळी देण्यापेक्षा एकत्र येवून वनवे लावणार्या दुष्ट प्रवृत्तींचा शोध घेणे गरजेचे आहे. यासाठी गावोगावी पुढाकार घेतला जाईल का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. वनविभागाचा असणारा अपुरा कर्मचारी वर्ग यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतुनेच हे वनवे लावले जात असल्याने याचा त्रास वन कर्मचार्यांना होताना दिसत आहे.

    डोंगररांगांवर असणारा हा गवताचा चारा पायथ्याशी असणार्या गावातीलच जणावरांसाठी याचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो. हा चारा जळून खाक झाल्यानंतर गावातील जनावरे कोठे जातील याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. दिवसेंदिवस कडब्याचे दर गगणाला भिडत आहेत. त्यामुळे गोरगरीबांकडे असणारी किंमती आणि दुभती जणावरे हिरव्या व वाळक्या चार्यापासून गावोगावची जणावरे वंचीत राहू लागली आहेत. तरी वनवा विझविताना कोणा नागरिकाचा होरपळून मृत्यू होवू नये याची काळजी घेत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पाठिशी राहणे ही जबाबदारी गावोगावच्या नागरिकांची वाढल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील अनेक डोंगरांना जाणीवपूर्वक आगी लावल्या जात आहेत. हा प्रकार योग्य नसून त्याचा तपास करण्याची वेळ वनविभागाच्या अधिकार्यांवरही येवून पडली आहे. वनविभागानेही अशा लोकांचा शोध घेवून त्यांना तात्काळ गजाआड करावे अशी मागणी तालुक्यातील जनता करीत आहे. काल दि. १२ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील एका इसमाचा वनवा विझविताना होरपळून मृत्यू झाल्याची नोंद महाबळेश्वर येथील पोलीस ठाण्यात झाली आहे.