…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल; मराठा आरक्षणावरून उदयनराजेंचा इशारा

    सातारा : कोल्हापूरच्या मूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रात्री उशिरा पत्र लिहिले आहे. या पत्रात सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी ‘मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती ‘खराटाच’ येत असल्याचे म्हटले. तसेच सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा पत्राद्वारे दिला आहे.

    आरक्षणाचा ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाज आरक्षणाच्या मागणीपासून कदापि मागे हटणार नाही. इतर समाजाबरोबर मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाने खूप संयमाची भूमिका घेतली म्हणून सरकारने त्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नये.

    सरकारने आता कुठलाही विलंब न करता येत्या ५ जुलैच्या आधी सर्व मागण्या मंजूर केल्याची घोषणा तात्काळ करावी. अन्यथा मराठा समाजातून जो उद्रेक होईल. त्याला सर्व लोकप्रतिनिधी आणि सरकारच जबाबदार असेल. सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.