सगळा खटाटोप पैशांसाठी !

सध्या कोरोना रुग्णांना बिलाबाबत अत्यंत वाईट अनुभव येत असून रुग्णांवर विनाकारण अव्वाच्या सव्वा बिलं लादली असल्याचा आरोप, भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.

सातारा : कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळत नसून बेड आणि व्हेंटिलेटरची सातत्यानं कमतरता भासत असल्याबद्दल भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारलाय. राज्यातली परिस्थिती पाहून एवढा निधी गेला कुठे, असा प्रश्न पडत असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय.

सगळा खटाटोप पैशांसाठी


रुग्णांकडून पैसे लुटण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचं उदयनराजेंनी म्हटलंय. अपुऱ्या सुविधा दाखवून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय. चांगल्या सुविधा देण्यासाठी अगोदरच निधीची तरतूद असताना रुग्णांकडून त्यासाठी का पैसे आकारले जात आहेत, असा उदयनराजे भोसले यांचा सवाल आहे.

पारंपारिक पूजन


साताऱ्यात खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस या ठिकाणी भवानी तलवारीचं साध्या पण विधिवत पद्धतीनं पूजन करण्यात आलं. दरवर्षी काढण्यात येणारी शाही मिरवणूक मात्र यंदा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली.

यावेळी उदयनराजेंनी जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. जगभरात कोरोनाचे सावट पसरल्याने विविध रुढी, परंपरा सण यावर्षी साजरे करता आले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कोरोना संकटाने लोकांमधील जिव्हाळा हिरावून घेतला आहे. हे थांबण्यासाठी आई भवानीचरणी प्रार्थना करत असल्याचं ते म्हणाले.