केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात उदयनराजेंना स्थान नाहीच; समर्थकांत नाराजी

    सातारा : राष्ट्रवादीच्या तिकिटावर विक्रमी मतांनी निवडून येऊन लोकसभेच्या सदस्यत्वाचा त्याग करून उदयनराजे भाजपवासी झाले. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी दारुण पराभव केला. भाजपने त्यांचे पुनर्वसन करून राज्यसभा देखील बहाल केली.

    मात्र, खासदार उदयनराजे यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सपशेल डावलले असून, भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी जी आश्वासने उदयनराजे यांना देण्यात आली होती, त्यांचा विसर आता केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाला पडला आहे, अशी चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि युवकांमध्ये असलेली उदयनराजेंची क्रेझ या सगळ्या गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने मोठ्या प्रयत्नाने भाजपमध्ये समाविष्ट करून साताऱ्यात आपली ताकत वाढवली. त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाचा गाजावाजा केला गेला.

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीमध्ये उदयनराजे भाजपवासी झाले. लोकसभेची पोटनिवडणूक पुन्हा लागल्यानंतर साताऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा घेण्यात आली. मात्र, उदयनराजे यांनी घेतलेल्या पक्ष बदलाच्या निर्णयाला सातारच्या जनतेने नाकारल्याने उदायनराजेंचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. परंतु उदयनराजेंना पुढे भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं जाईल, अशी आशा त्यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना होती आणि अशा चर्चा ही जोरदार रंगल्या होत्या.

    राजेंचा राजकारणात वेगळाच दबदबा

    आता जो केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होत आहे त्यामध्ये उदयनराजे भोसले यांना कुठंही स्थान देण्यात आले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. उदयनराजे यांची आक्रमक शैली, त्यांची अनोखी क्रेझ यामुळे राज्यातील राजकारणात त्यांचा एक वेगळाच दबदबा आहे.

    उदयनराजेंना मागे टाकत रणजितसिंह निंबाळकर मंत्रिपदाच्या वाटेवर?

    राष्ट्रवादीमध्ये असताना उदयनराजे भोसले यांच्या याच क्रेझमुळे पक्षामध्ये अंतर्गत विरोध असूनसुद्धा कुणालाही न जुमानता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांच्या पाठीशी उभे होते. परंतु आता भाजपला उदयनराजे यांच्या या नेतृत्वाचा विसर पडला असल्याचे चित्र दिसत आहे. उदयनराजे यांना डावलून पहिल्यांदाच खासदारकीची माळ गळ्यात पडलेले माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे भाजप उदयनराजे यांना महाराष्ट्रात भाजपचा मुख्य चेहरा म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत असताना अचानकपणे मंत्रिपद शर्यतीत त्यांचे नाव नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.