…म्हणून खासदार उदयनराजे घेणार पंतप्रधान मोदींची भेट

    सातारा  : सातारा शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भेटणार आहोत. याबाबत पीएमओ कार्यालयाशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही भेटून सातारा पॉटेबल वॉटरचा पायलट प्रोजेक्ट राबविणार आहोत. त्यासाठी लागतील ते प्रयत्न आणि पाठपुरावा आम्ही स्वतः करणार आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात वार्तालाप करताना दिली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मिशन हॉस्पिटलचे वाईचे संचालक रॉबर्ट मोझेस आदी उपस्थित होते.

    पॉटेबलसाठी जलशक्ती मंत्र्यांना भेटणार

    सातारा जिल्ह्यात ११ धरणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक बंधारे, के. टी. वेअर आहेत. तथापि भौगालिक परिस्थितीमुळे पश्चिमभाग अतिवृष्टीचा आणि पूर्वभाग अवर्षणग्रस्त आहे. याचा विचार करून, पॉटेबल वॉटरचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प साताऱ्यात राबविण्यात येणार आहे. त्याकरीता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना भेटून त्यांना तसा प्रस्ताव देण्यात येईल. त्यासाठी याेग्य तो पाठपुरावा व कार्यवाही करण्यात येईल, असे खासदार उदयनराजे यांनी सांगितले.

    साताऱ्यातील शहरे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आग्रही

    सातारा जिल्ह्यातील शहरे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. सध्या केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानामुळे अनेक गावे ओडीएफ आणि ओडीएफ प्लस होत आहेत. सार्वजनिक ठिकाणी असलेली शौचालयांमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. स्मार्टसिटी होण्यासाठी अनेक नवनवीन स्मार्ट संकल्पना आणि उपक्रम राबवावे लागतील. या स्मार्ट सुविधांचा उपयोग सामान्यांपासून सर्वांनी होईल, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.