कोरेगाव स्मार्टसिटी अंतर्गत भुयारी वीज वाहिनी प्रकल्प लवकरच कार्यान्वित : आमदार महेश शिंदे

  कोरेगाव : कोणी किती वल्गना केल्या तरी, कोरेगावला स्मार्टसिटी बनविण्याचे भाग्य मलाच लाभले आहे. मतदारांनी २०१९ मध्ये केलेल्या परिवर्तनामुळे आता कोरेगावचा चोहोबाजूने विकास होणार आहे. भुयारी गटार योजना, रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण पाठोपाठ आता भुयारी वीज वाहिनी प्रकल्पाचे काम लवकरच सुरु केले जाणार आहे, त्याद्वारे अखंडीत वीज पुरवठा होईल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

  कोरेगाव शहरातील अंतर्गत रस्ते आणि भुयारी गटार योजनेसाठी ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी बाजारपेठ, व्यापार पेठ, बुरुडगल्ली, रामलिंग नगर व चौथाई गल्ली परिसरात सुमारे ३ कोटी ५ लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी आ. शिंदे यांनी राहूल प्र. बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, राहूल र. बर्गे, महेश शा. बर्गे यांच्यासह शुक्रवारी दुपारी केली. यावेळी रहिवाश्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

  आमदार शिंदे पुढे म्हणाले की, हार्ट ऑफ सिटी म्हणजे बाजारपेठ, व्यापार पेठ, बुरुडगल्ली, रामलिंग नगर व चौथाई गल्ली परिसरातील रस्ते अरुंद असून, वीज वाहिनी व खांबांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य जनतेला बसला आहे. कोरेगावच्या विकासासाठी ही बाब धोकादायक असल्याने तातडीने महावितरण कंपनीच्या उच्चपदस्थ अभियंत्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. उपकार्यकारी अभियंता अभिजित महामुनी, सहाय्यक अभियंता जर्नादन पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण केले. लवकरच त्याचे काम सुरु होणार आहे. भुयारी वीज वाहिनीमुळे १२ महिने अखंडीत वीज पुरवठा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  कोरेगाव शहरात सध्या सुरु असलेली आणि होऊ घातलेली विकासकामे ही दर्जेदार, ठोस आणि टिकाऊच होणार आहे. सामान्य जनतेने क्वालिटी कंट्रोलरची भूमिका बजावावी, म्हणजे कामाबाबत शंकाच उत्पन्न होणार नाही, ज्या शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणाखाली विकासकाम होत आहे, त्यांचे संबंधित अधिकारी हे काम सुरु असेपर्यंत साईटवर थांबलेले आहेत, त्यांच्याशी कधीही आपण बोलू शकता, अडचणी सांगू शकता, शासनाच्या क्वालिटी कंट्रोलरची जबाबदारी आता सामान्य जनतेवर सोपविण्यात आली आहे, त्यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

  राजाभाऊ बर्गे म्हणाले की, गेली अनेक वर्षे गटारातील पाणी रस्त्यावर येत असल्याने खड्डे पडत होते, रस्ता खराब होत होता, भुयारी गटार योजना आणि ट्रिमिक्स काँक्रीटीकरणामुळे ही समस्या आता कायमस्वरुपी संपणार आहे. भुयारी गटार आणि रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटकरण करण्यापूर्वी सर्व नागरिकांना माहिती देण्यात आली. त्यांचे नळ कनेक्शन नगरपंचायतीमार्फत तातडीने स्थलांतरीत करण्यात आली. सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली. रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

  यावेळी राजेंद्र ओसवाल, सुरेश कुलकर्णी, अजय बर्गे, किशोर बागवडे, डॉ. किरण क्षीरसागर, डॉ. विजय बर्गे, कुमार शिंदे, अवधूत कालेकर, सचिन कदम, अमित गाडे यांनी नागरिकांच्या वतीने वॉर्डच्या विकासाबाबत चर्चा केली.

  ठेकेदारी राज नाही; आता पारदर्शकच काम : महेश शिंदे

  २०१९ पूर्वी काय परिस्थिती होती, हे आता सांगायला नको. सामान्य जनतेने मोठ्या विश्वातसाने आमदार बनविले आहे, त्यामध्ये कोरेगाव शहराचा सिंहाचा वाटा आहे. कोरेगावकरांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ दिला जाणार नाही. जनताभिमूख काम करताना, कोठेही ठेकेदारी राज दिसणार नाही. विकासकाम असेल, ते जनतेचेच असेल, त्यांच्या इच्छेनुसार दर्जेदार पध्दतीने होईल, त्यामध्ये कोणाला शंका उत्पन्न होणार नाही, इतके ते पारदर्शक असेल, असे महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.