मल्हार पेठेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे; संतोष शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    सातारा : सातारा शहरातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन मल्हार पेठ व गुरुवार पेठ येथील जेष्ठ नागरिकांसाठी त्याच परिसरात करोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सातारा पालिकेच्या वृक्ष प्राधिकार समितीचे सदस्य संतोष शिंदे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यातील एकूण बाधितांच्या तुलनेत सातारा शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षणीय आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास टेस्टिंग आणि लसीकरण वाढवणे खूप गरजेचे झाले आहे. सातारा शहरात सध्या जिल्हा रुग्णालय, गोडोली, कस्तुरबा हॉस्पिटल अशा ठराविक ठिकाणीच लसीकरण केंद्र सुरू असून, त्याठिकाणी शहरातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे येथील केंद्रांवर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचा परिणाम शहरातील जेष्ठ, अपंग, तसेच महिला वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरीही लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ताटकळत उभे असलेल्या नागरिकांना लस न घेताच माघारी परतावं लागत आहे.

    या सर्व बाबींचा विचार करून शहरांतील मल्हार पेठ व गुरुवार पेठ येथील नागरिकांसाठी याच परिसरात असणाऱ्या समाज मंदिर अथवा उपलब्ध असेल त्या शाळा, हॉल अशा ठिकाणी तत्काळ लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबण्यास मदत होईल, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे.