वडूजचा वृत्तपत्र विक्रेता सामाजिक बांधिलकीसाठी २९ व्या रक्तदानासाठी सज्ज

    सातारा : हुतात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीत अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. आता त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते सुयोग विजय शेटे यांनी ३९ व्या वर्षी २९ व्या वेळी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. तसेच परिसरातील इतर सहकाऱ्यांनाही रक्तदानासाठी विनंती करत आहेत.

    15 वर्षांपूर्वी आई शोभा शेटे यांच्या शस्त्रक्रियावेळी ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. त्यावेळी त्या गटाचे रक्त मिळवण्यासाठी खूपच धावपळ उडाली होती. याची जाणीव ठेवून वयाच्या २४ व्या वर्षी सातारा येथे जाऊन प्रथम रक्तदान केले होते. त्याबदल्यात आवश्यक रक्तगट उपलब्ध झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत रक्तदान शिबीर, शिवजयंती व इतर वेळी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले आहे. रक्तदानामुळे मानसिक समाधान मिळते, कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. शारीरिक क्षमता वाढते, नवीन ऊर्जा निर्माण होते. गरजवंतांना रक्त दिल्याचे पुण्य लाभते, अशी त्यांची धारणा आहे.

    खटाव तालुक्यातील वडूज बसस्थानकामधील प्रवेशद्वारजवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक वसंतराव शेटे यांनी १९५७ साली वृत्तपत्र वितरण करण्याची जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी अनेक वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविले जात होते. आज त्यांची तिसरी पिढी या व्यवसायात स्थिरावली आहे. वडूज नगरीत मंगळवारी रक्तदान शिबीराचे खटाव पंचायत समितीच्या आवारात आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी सुयोग शेटे हे २९ व्या वेळी रक्तदान करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ४०० ते ५००मिली एकावेळी रक्तदान केले जाते. आतापर्यंत दहा ते बारा लिटर रक्तदान केले असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली. वृत्तपत्र वितरण व विक्री करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुयोग शेटे यांचे अनेकांनी अभिनंदन केले.