वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

    सातारा : शिक्षण व लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन पदोन्नती लागू करावी, ओबीसींची शासकीय सेवेत मेगा भरती करून या समाजास न्याय द्यावा, कोविडमध्ये ज्या पाल्ल्यांचे आईवडिल मृत्यू पावले. त्या पाल्यांना शासनाने पूर्ण दत्तक घेण्याचे जाहीर केले. त्याची पूर्ण अंमलबजावणी अजून झाली नाही. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

    यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, शरद गाडे, सुहास पुजारी, ऍड. दयानंद माने, सतीश काबंळे, गणेश भिसे, द्राक्षा खंडकर, चित्रा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी सर्व नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात, ओबीसी समाजावर गेल्या 75 वर्षापासून अन्याय होत आहे. तो दूर करण्यासाठी ओबीसी जात निहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत त्याची शासनप्रशासन किती भागिदारी आहे, याची आकडेवारी समोर येणार नाही.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण बलुतेदार सामाजिक, आर्थिक दृष्टय़ा उद्धवस्त झाला आहे. त्याचे लघु उद्योग सुरु करण्यासाठी प्रत्येकी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत एक रक्कमी मदत सर्वांना करावी, ओबीसी आर्थिक विकास मंडळे सुरु केली आहेत. त्या मंडळाची जिल्हानिहाय कार्यालये सुरु करण्यात यावीत. पूर्ण अंशी अर्थपुरवठा करण्यात यावा, शिक्षण व नोकरीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन पदोन्नती सुद्धा लागू करावी, आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.