वरकुटे-मलवडीचे कोरोना सेंटर आदर्शवत : माजी सभापती संदीप माडवे

    म्हसवड : माण तालुक्यातील ‌वरकुटे-मलवडी येथे अभय जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेला माणदेश फाऊंडेशन संचलित संकल्प कोरोना सेंटर खूप चांगल्याप्रकारे चालवले आहे. सर्व सोयीसुविधा मोफत देऊन कोरोनाबाधितांवर उपचार करणारे जिल्ह्यात एकमेव कोरोना सेंटर आहे. वरकुटे – मलवडी परिसरातील कोरोना बाधितांना आधार देण्याचे काम संकल्प कोरोना सेंटरने चांगल्या पद्धतीने केले असून, ग्रामस्थांनी या सेंटरला मदत केल्यामुळे हे कोरोना सेंटर जिल्ह्यात आदर्शवत ठरले असे खटावचे माजी सभापती पै. संदीप माडवे यांनी सांगितले.

    वरकुटे – मलवडी व परिसरात कोरोनाचा आकडा वाढू लागला होता. या गावातील गरीब कोरोनाबाधित रुग्णांची फरफट थांबविण्यासाठी व बाधितांवर उपचार करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांच्या प्रयत्नाने सहकार्याच्या मदतीने हायस्कूलमध्ये ७ ऑक्सिजन बेडसह ७० बेडचे सुसज्ज असे कोरोना सेंटर सुरू केले होते. या सेंटरच्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजुशेठ जानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव प्रा. एन. पी. खर्जे , सरपंच ज्ञानेश्वर शिंदे , संजय जगताप, महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे , माजी सरपंच विजय जगताप , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आटपाडकर , धिरज जगताप , बाबाराजे हुलगे , युवा नेते विक्रम शिंगाडे , गामपंचायत सदस्य दिलीप खरात , जालिंदर वाघमोडे , ऋषीकेश जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    मांडवे पुढे बोलताना म्हणाले, या परिसरातील सामान्य लोकांना बेड न मिळणे अथवा खाजगी दवाखान्यात पैशांअभावी उपचार घेऊ शकत नाहीत अशा अनेक अडचणीत सापडलेल्या रुग्णांना अभय जगताप यांनी सुरू केलेले सेंटर संजीवनीच ठरले आहे.

    यावेळी अभय जगताप बोलताना म्हणाले, या सेंटरमध्ये सर्व रुग्णांवर उपचार मोफत केले आहेत. एमडी तज्ञ डॉक्टर , प्रशिक्षित नर्स , मोफत रुग्णवाहिका , मोफत औषध अशा अनेक सर्व सुविधा पुरवल्या आहेत. वरकुटे मलवडीचे लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब जगताप यांनी रुग्णांसाठी लाखो रुपये खर्च करून मोफत नाष्टा – जेवण पुरविण्याची सोय केली. त्याचबरोबर आयकर विभाग अतिरिक्त आयुक्त नितीन वाघमोडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त सुरेश जाधव, तहसीलदार जीवन बनसोडे, लंडनमध्ये उद्योजिका असलेल्या रचना जगन्नाथ माने यांचे महत्त्वपूर्ण योगदान या सेंटरसाठी लाभले.