भाजीपाला उत्पादक अडचणीत; शेतीचे बजेट कोलमडले, आता मदार येणार्‍या हंगामावर…

    वावरहिरे : कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत आजही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. ही वस्तुस्थिती वारवांर दिसून येते. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी दुबार पेरणी तर कधी सुलतानी संकटांना येथील शेतकरी तोंड देत असतो. कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्यात मागील दोन-तीन वर्षांपासून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

    यंदा तालुक्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी असुनही विहिरी, बोअरवेल, बंधारे तुडुंब भरलेत. दुष्काळी माणमध्ये खरिप पिक हंगामात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने येथील शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळाले. मोठ्या प्रमाणात लागवडही झाली. अन् आता भाज्यांची विक्रीस आवक मोठ्या प्रमाणात वाढली. सुरुवातीपासून भाज्याचे दर पडल्याने शेती उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतीचे आर्थिक गणित कोलमडले.

    वावरहिरे, मोही, मार्डी, शिंगणापुर, राणंद, सोकासन येथील शेतकरी चार पैसे मिळतील, आर्थिक स्तर उंचावेल, बँक व सावकारांच्या कर्जाची परतफेड होईल या आशेने मोठ्या प्रमाणात टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, मिरची आदीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.

    शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकही उभा केले. उत्पादनही बरघोस काढले अन् आता पिक काढणीला आले अन् बाजारभावात ते कवडीमोड दरात द्यावे लागत असल्याने कष्टाने पिकावलेल्या भाज्याचे दर निम्मेही मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला बांधावर व जनावरांच्या पुड्यात टाकत असल्याचे विदारक चित्र दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

    सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही

    शेतकर्‍यांची अवस्था सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही. शेतकरी हिताला प्राधान्य देत शेती पिकांना हमीभाव देणे गरजेचे आहे. आज शेती अन् शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. कर्ज वसुलीसाठी बँका याचा तगादा सुरु आहे. त्या पिकाला भाव नाही. परिणामी, कुटुंबाचा गाडा हाकणे अवघड होऊन बसले आहे. शेतकर्‍यांच्या कुठल्यांही मालाला योग्य हमीभाव नसल्याने शेतकर्‍यांची अवस्था “सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही” अशी झाली आहे