माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विलास देशमुख तर उपसभापतिपदी वैशाली विरकर

    म्हसवड : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विलास देशमुख तर उपसभापतिपदी वैशाली विरकर यांची निवड करण्यात आली. सातारा जिल्ह्यात एकमेव झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेत बाजी मारत याठिकाणी भाजप रासपचा झेंडा उभारला. तेव्हापासूनच माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी विलास देशमुख यांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरु होती.

    औपचारिकता आमदार गोरे यांच्या निर्णयाची होती. मात्र, मार्केट कमिटीच्या उपसभापतिपदासाठी आमदार गोरे कोणाला संधी देणार याची उत्सुकता ताणली गेली होती. उपसभापतिपद हे रासपकडे जाणार हे निश्चित झाले होते. मात्र, रासप येथे नक्की कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले असताना रासपच्या वरिष्ठांनी बैठक घेऊन मार्केट कमिटीच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणाऱ्या मामूशेठ विरकर यांच्या पत्नी वैशाली विरकर यांना प्रथम संधी देण्याचे सर्वानुमते ठरल्याने उपसभापतिपदासाठी रासपकडून वैशाली विरकर यांचे नाव पुढे आल्याने त्यांची मार्केट कमिटीच्या उपसभापतिपदी निवड करण्यात आली. तर मार्केट कमिटीच्या सभापतिपदासाठी विलास देशमुख यांचीच वर्णी आमदार गोरे लावतील अशी अगोदरच चर्चा सुरु होती.

    सभापती विलास देशमुख हे आमदार गोरे यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर आमदार गोरे यांच्यासाठी प्रत्येक निवडणुकीत हिरहिरने व प्रामाणिकपणे काम केल्यानेच त्यांना सभापती पदासाठी संधी गोरे यांनी दिली असल्याचे बोलले जात असून, देशमुख यांच्या निवडीने आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मार्डी गट भक्कम केला असल्याचे बोलले जात आहे.

    दरम्यान, नूतन सभापती उपसभापतींचे सर्व सदस्यांचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोरे, भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्यासह रासपचे आप्पासाहेब पुकळे, बबनदादा विरकर, मामुशेठ विरकर, डी. जी. दोरगे आदींनी अभिनंदन केले.

    मिळालेल्या संधीचे सोनं करणार : विलास देशमुख

    आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळेच आपणाला माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी संधी मिळाली असून, या संधीचे सोनं करुन दाखवण्याची हीच खरी वेळ आहे. आगामी काळात तोट्यात असलेल्या या मार्केट कमिटीच्या उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबवून कराड, वाई प्रमाणे माण मार्केट कमिटीचा नामोल्लेख केला जाईल यासाठी प्रयत्न करणार असून, उत्पन्न वाढीसाठी व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे नवनिर्वाचित सभापती विलास देशमुख यांनी यावेळी सांगितले.