खंडाळा साखर कारखान्यासाठी रविवारी मतपत्रिकेद्वारे मतदान

मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३० पथके तयार करण्यात आली आहेत. २६ मतदान केंद्रे उभारली असून, यासाठी केंद्राध्यक्षासह पाच मतदान अधिकारी एका मतदान केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. १८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, देखरेखीसाठी सहा झोनल ऑफिसर कार्यरत असणार आहेत.

    खंडाळा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्यासाठी येत्या रविवारी मतदान प्रक्रिया होणार आहे. हे मतदान मतपत्रिकेवर शिक्का मारून होणार असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणेची तयारी झाल्याचे मत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.

    या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दशरथ काळे व सहायक निबंधक देविदास मिसाळ उपस्थित होते. या मतदान प्रक्रियेसाठी एकूण ३० पथके तयार करण्यात आली आहेत. २६ मतदान केंद्रे उभारली असून, यासाठी केंद्राध्यक्षासह पाच मतदान अधिकारी एका मतदान केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. १८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, देखरेखीसाठी सहा झोनल ऑफिसर कार्यरत असणार आहेत.

    या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदारांची मतदान करताना दिशाभूल होऊ नये, यासाठी मतपत्रिका वेगवेगळ्या रंगाच्या असणार आहेत. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार असल्याने आदल्या दिवशीच सर्व मतदान अधिकारी कामावर हजर होणार आहेत. या मतदानाची मतमोजणी मंगळवारी (ता. १९) किसन वीर सभागृहात होणार आहे.