चारचाकी अंगावर घालून दुखापत करणाऱ्यास वाई पोलिसांकडून २४ तासांत अटक

  वाई : आसरे येथील जगन्नाथ सणस (वय ७५) यांच्या अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने चारचाकी घालून त्यांना गंभीर दुखापत केली. त्यानंतर संबंधित व्यक्ती वाहनासह पळून गेला होता. मात्र, आरोपी गणेश घोलप (रा. बावधन) याला वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून २४ तासांच्या आत अटक केली.

  सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र तेलतुमडे यांनी अपघातग्रस्त वाहनासह आरोपीला गजाआड करून त्यास वाईच्या न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आसरे
  ग्रामस्थांना काही तासातच न्याय मिळवून दिल्याबद्दल आसरे ग्रामस्थांसह वाईच्या पश्चिम भागातील नागरिकांनी वाई पोलिसांचे आभार मानले.

  रविंद्र तेलतुमडे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, वाई वाईच्या पश्चिम भागातील आसरे ता.वाई येथील जगन्नाथ बापू सणस (वय ७५) यांच्या राहत्या घरात संशयास्पदरित्या गणेश घोलप ७ जूनच्या १२ वाजण्याच्या सुमारास घुसला होता. नंतर तो पळून जात असताना जगन्नाथ सणस आणि त्यांचा मुलगा स्वप्निल या दोघांनी त्याचा पाठलाग केला. पण अंधाराचा फायदा घेऊन आरोपी गणेश घोलप हा पळून जाण्यास यशस्वी झाला होता. गणेश घोलप हा पुन्हा वाईच्या दिशेने याच रस्त्यावरुन जाणार आपण त्यास थांबवून विचारु की तू आमच्या घरी एवढ्या रात्री का आला होता? याचा जाब विचारण्यासाठी हे दोघे गेले.

  घरासमोरील आसरे वाई रस्त्यावर थांबले असताना आरोपी गणेश घोलप हा (एम.एच. ४२ ऐ.२४४६) ही स्वत: भरघाव वेगात गाडी चालवत येत असताना त्याला थांबण्यासाठी हात केला असता त्याने समोर उभी माणसं दिसत
  असतानाही जिवे मारण्याच्या उद्देशाने गाडी अंगावर घातली. यामध्ये जगन्नाथ बापू सणस यांना गंभीर जखमी करुन वाहनासह पलायन केल्याची तक्रार वाई पोलिसात दाखल झाली होती.

  पोलिसांच्या सूचना

  घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी वाहनासह पळून गेलेल्या आरोपीस तात्काळ पकडण्याठी रविंद्र तेलतुमडे यांना सूचना दिल्या. तेलतुमडे यांनी मिळालेल्या माहितीवरुन सहकारी अजित जाधव, निलेश देशमुख, चालक अमित गोळे यांना सोबत घेऊन वाई पसरणी रस्त्यावर रात्री १२ नंतर सापळा लावून थांबले असता एक वाजण्याच्या सुमारास फरार असलेला आरोपी चारचाकीसह जाळ्यात अडकला. त्याला वाईच्या न्यायालयात उभे केले असता त्याला ११ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले आहेत.