वाईत फिल्मसिटी उभारणार, साताऱ्याला जगाच्या नकाशावर आणणार : उदयनराजे भोसले

महाराष्ट्रातील एकमेव हिलस्टेशन महाबळेश्वर, पाचगणी लगत असलेला कास परिसर आहे. हा एकाच रेंजचा भाग आहे. या परिसरात जास्तीत जास्त ॲडव्हेंचर स्पोर्ट यावेत. जास्तीत जास्त सर्व भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण झाले पाहिजे. यातून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊन हाताला काम मिळेल.

    सातारा : जिल्ह्याचा टुरिझमच्या माध्यमातून विकास होऊन येथे ॲडव्हेंचर स्पोर्टस्‌ आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण होण्यासाठी वाई येथे फिल्मसिटी (Filmcity) उभारण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. यातून साताऱ्याला जगाच्या नकाशावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिली.

    मेघराज राजेभोसले यांनी काल खासदार उदयनराजे यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा नाईकांची भूमिका करणारे माधव अभ्यंकर, पंकज चव्हाण उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उदयनराजेंशी फिल्मसिटी उभारण्याबाबत चर्चा झाली. यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘‘जिल्ह्याला नैसर्गिक देणं मिळालेली आहे, ते पाहून पर्यटन विकासासाठी एमटीडीसी व अन्य विभागांच्या माध्यमातून काम करावे लागणार आहे. त्यासाठी आम्ही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार नवरात्रीनंतर आम्ही या भागाचा दौरा करणार आहोत. १२ धरणे असलेला एकमेव जिल्हा असून, येथे सह्याद्री व्याघ्र प्रोजेक्ट आहे.

    महाराष्ट्रातील एकमेव हिलस्टेशन महाबळेश्वर, पाचगणी लगत असलेला कास परिसर आहे. हा एकाच रेंजचा भाग आहे. या परिसरात जास्तीत जास्त ॲडव्हेंचर स्पोर्ट यावेत. जास्तीत जास्त सर्व भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण झाले पाहिजे. यातून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊन हाताला काम मिळेल.’’ मेघराज राजेभोसले म्हणाले, ‘

    ‘वाईमध्ये चित्रनगरी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून मराठी, हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करता यावे, यासाठी आम्ही वाईतून सुरुवात करत आहोत. संपूर्ण जिल्ह्यात शूटिंगचे स्पॉट डेव्हलप करून कलानगरी म्हणून सातारा उदयास आणण्यासाठी आमचे काम सुरू आहे.