पोलिसांच्या दडपशाहीचा वारकऱ्यांकडून साताऱ्यात निषेध

    सातारा : पंढरपूर पायी वारीच्या मुद्यावरून जिल्हा प्रशासन व वारकरी सोमवारी आमनेसामने आले. वारकऱ्यांनी प्रशासनाची दंडेलशाहीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भजन आंदोलन करत निवेदनाच्या प्रती फाडल्या. तब्बल दोन तास भजन आंदोलन करत बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेची मागणी केली. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वतः आंदोलक वारकऱ्यांची भेट घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.

    व्यसनमुक्त संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ आणि इतर वारकऱ्यांना मेढा पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. सर्व आंदोलक पोलीस बंदोबस्तातच सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता. शीघ्र कृती दलाचे जवानही तैनात करण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बॅरिकेटिंगने बंद करण्यात आले होते .

    पालखी सोहळ्याचे मार्गदर्शक हभप बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करावी, या मागणीचे निवेदन वारकरी संप्रदायाचे काही सदस्य शांततापूर्ण मार्गाने प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. विलासबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मेढा ते सातारा असा प्रवास पोलीस गाडीतूनच करावा लागला. पोलिसांच्या या दंडेलशाहीचा पंचवीस वारकऱ्यांनी निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत भजनं आंदोलन सुरू केले.

    वारकऱ्यांनी निवेदनाच्या प्रती फाडल्या तरी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर झाल्याचा दावा शहर पोलिसांनी केला. दोन तासाच्या आंदोलनानंतर वारकरी निषेध नोंदवून माघारी मेढा येथे परतले. पंढरपूरच्या पायी वारी संदर्भात हभप बंडातात्या कराडकर जी भूमिका जाहीर करतील ती मान्य असेल, त्यांची लवकरच करवडी ता कराड येथे भेट घेणार असल्याचे विलासबाबा जवळ यांनी स्पष्ट केले .