प्रभाग रचना व लोकसंख्येचे नकाशे पालिकेने मागविले; जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग

  सातारा : सातारा पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे व लोकसंख्या वाढीचा अचूक तपशील जनगणना आयोगाकडून मागविला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या वर्तुळात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. पालिकेने निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू केली असून, मंगळवारी राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेत आहे.

  राज्य निवडणूक आयोगाने वार्ड रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश नगरपालिका व नगरपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आपल्या वार्डात आपली उमेदवारी कशी सक्षम राहील, या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षातील इच्छुक आतापासूनच तयारीला लागले आहेत.

  सातारा जिल्ह्यातील मलकापूर वगळता उर्वरित आठ नगरपालिकांची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती. करोनामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जनगणना विभागाकडून चौदा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रगणक गटाचे नकाशे व लोकसंख्येचा तपशील वॉर्डनिहाय मागविला आहे.

  स्थानिक स्वराज्य संस्थांची २०१६ रोजी झालेली पंचवार्षिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. तेव्हा एका प्रभागातून दोन सदस्य निवडून आले होते. आता बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू होणार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे. सातारा पालिकेची नुकतीच हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढीमुळे यंदा ४८ वार्ड निश्चित होणार असून नगरसेवक संख्याही ४० हूून ४८ इतकी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार हद्दवाढ लागू झालेल्या नगरपालिकांनी भौगोलिक बदल आणि क्षेत्र निश्चिती करून त्याचे नकाशे तयार करावयाचे आहेत. कच्चा आराखडा पूर्ण होताच त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे.

  दरम्यान, साताऱ्यासह जिल्ह्यातील आठही पालिका व नगरपंचायतींमध्ये गेल्या पावणे पाच वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवाय राजकीय समिकरणेही बदलली आहेत. याचा कुणाला फटका बसणार आणि कुणाला लॉटरी लागणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  आराखड्याबाबत उद्या बैठक

  वार्ड रचनेच्या प्रारूप आराखड्याबाबत मंगळवारी (दि. २४) राज्य निवडणूक आयोगाकडून बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांचा ऑनलाईन सहभाग असणार आहे. बैठकीत प्रारूप आराखड्याबाबत सविस्तर चर्चा होणार असून, निवडणूक आयोगाकडून काय निर्णय घेतले जातायत, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  निवडणुकीचे असे आहेत टप्पे

  – कच्चा प्रारुप आराखडा
  – लोकसंख्येचा नकाशा आणि हद्द निश्चिती
  – हद्दनिश्चितीवर हरकती व सुनावणी
  – अंतीम मतदार यादी
  – सदस्य निश्चिती
  – वार्ड व नगराध्यक्ष आरक्षण
  – आचारसंहिता
  – मतदान, मतमोजणी, निकाल

  या पालिका, नगरपंचायतींची निवडणूक

  पालिका : सातारा, कऱ्हाड, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड

  नगरपंचायत : खंडाळा, दहिवडी, पाटण, वडूज, कोरेगाव, लोणंद