घनकचरा व्यवस्थापनात पाचगणी देशात रोलमॉडेल

    पाचगणी : केंद्रीय नीती आयोगाच्या घनकचरा व्यवस्थापनच्या जुल्फिक शेख, उज्ज्वल नायक या तज्ज्ञांनी पाचगणी शहराला भेट दिली. यामध्ये त्यांनी पालिकेच्या कार्याचे कौतुक करीत घनकचरा व्यवस्थापनाची यशोगाथा मार्गदर्शक पुस्तिकेच्या माध्यमातून देशातील इतर पालिकांच्या समोर आदर्श ठेवला जाणार असल्याची माहिती दिली.

    घनकचरा व्यवस्थापनामध्ये पाचगणी शहराने राखून ठेवलेले सातत्य हे उल्लेखनीय आहे. यामध्ये देशातून २६ नगरपालिका, महानगरपालिकांची यासाठी निवड करण्यात आली. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये सर्वोत्तम पद्धती अभ्यासानुसार, सीएसई-एनआयटीआयने एसडब्ल्यूएमच्या शाश्वत आर्थिक मॉडेलसाठी पाचगणी नगरपरिषदेची निवड केली.

    सेंटर ऑफ सायन्स नवी दिल्ली यांचे पथक चार दिवसांपूर्वी पाहणीसाठी आले होते. या पथकाने चार दिवस वास्तव्य करून येथील कचरा व्यवस्थापनाबाबत संपूर्ण माहिती घेतली व नव्याने चालू असणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी काही मार्गदर्शक सूचनाही दिल्या. पाचगणी शहरात कचरा व्यवस्थापन कसे केले जाते, हे या यशोगाथा मार्गदर्शक पुस्तिकेचा माध्यमातून संपूर्ण देशातील इतर शहरांना पाचगणीचा घनकचरा प्रकल्प दाखवून त्याच्यासमोर पाचगणी नगरपरिषदेचा आदर्श ठेवला जाणार आहे.

    घनकचरा व्यवस्थापनाची विस्तृतपणे माहिती देशपातळीवर मांडली जाणार 

    वेस्ट टू वेल्थ या घनकचरा व्यवस्थापनाची विस्तृतपणे माहिती आता देशपातळीवर मांडली जाणार आहे. शहरातील घनकचरा प्रकल्प अत्ता देशासाठी आदर्श बनत आहे. त्या निमित्ताने पाचगणीचे रोलमॉडेल देशाने मान्य केलं आहे.