महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाची कामे घ्यावीत : नंद कुमार

    सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 262 प्रकारची कामे घेता येतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्तीगासाठी रोहयोतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणत करावीत, अशा सूचना रोहयो, मृद जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी केल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नंद कुमार यांनी रोहयो, मृद जलसंधारण विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, डॉ. अविनाश पोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यात कमी पाऊस पडतो. या तालुक्यातील शेतकऱ्यांना सहजपणे दोन पिके कशी घेतला येतील यासाठी नियोजन करा. तसेच उपलब्ध असलेल्या सिंचन क्षमतेवर जास्तीत जास्त उत्पन्नात वाढ होण्यासाठी कृषी विभागाने काम करावे.

    शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा. यासाठी अधिकचे क्षेत्र हे ठिबकखाली आणावे. जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी ठिबक सिंचनाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच रोहयोअंतर्गत 262 प्रकारची कामे हाती घेता येतात, याची माहितीही शेतकऱ्यांना द्या, अशा सूचनाही नंद कुमार यांनी बैठकीत केल्या.