पाणीपुरवठा सभापती साताऱ्यात करणार ‘गांधीगिरी’; शहरात सुरू होणार ‘पाणी वाचवा अभियान’

पाणी वाया घालविणाऱ्या नागरिकांना बिसलेरीच्या बाटलीसह गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करत पाणी वाचवा, जल- जीवन वाचवा असा संदेश त्या देणार आहेत.

सातारा: सातारा शहरात लवकरच पाणी वाचवा अभियान सुरू होणार असून पाणी पुरवठा सभापती सीता हादगे पाणी वाया घालविणाऱ्या नागरिकांना बिसलेरीच्या बाटलीसह गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करत पाणी वाचवा, जल- जीवन वाचवा असा संदेश त्या देणार आहेत. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचविण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे .

दोन महिन्यानंतर सुरु होणार्‍या उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सातारा नगर पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे या शहरामध्ये पाणी वाचवा अभियान हाती घेणार आहेत. प्रतिदिन पहाटेच्या सुमारास अचानक प्रभाग भेटी देवून पाणी विनाकारण वाया घालवणार्‍या नागरिकांना बिसलेरीच्या बाटलीसह गुलाब पुष्प देवून गांधीगिरी करत पाणी वाचवा, जल- जीवन वाचवा असा संदेश त्या देणार असल्याचे समजते. दरम्यान, यावेळी पाणी वाया घालवणाऱ्यासमवेत सीता हादगे या छायाचित्र काढणार आहेत.

सातारा शहराची लोकसंख्या १ लाख २० हजार ९५ एवढी आहे. सद्य परिस्थितीत कास जलाशय आणि शहापूर बंधार्‍यातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. १२ हजार ७०० नळ कनेक्शन आहेत. सातार्‍यात एकूण ४० प्रभाग असून हद्दवाढीमध्ये ७ प्रभाग वाढल्याने प्रभागाची संख्या ४७ वर पोहोचली आहे. थोडक्यात शहरामध्ये १५ हजार नळ कनेक्शनमध्ये वाढ होणार आहे. कास जलाशयामध्ये ६ एमएलडी एवढा पाणी साठा होतो. सध्या कास जलाशयाची उंची वाढवण्याचे का सुरु असून ते पुर्ण झाल्यानंतर जलाशयात १ टीएमसी एवढा पाणीसाठा होणार आहे.

गतवर्षी म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये कास जलाशयातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे दोन दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात असे. त्यामुळे सातारकरांवर कोणी पाणी देता का पाणी अशी म्हणण्याची वेळ आली होती. त्यामुळे तत्कालीन पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सातारा विकास आघाडीचे प्रमुख उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करून, पहाटे प्रभाग भेटी देवून नागरिकांना पाणी वाया न घालवण्याचे आवाहन करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. दोनच T महिन्यानंतर उन्हाळा येवून ठेपला असल्यामुळे पाण्याची काटकसर आत्तापासूनच करण्याची गरज निर्माण झाली आहे.