गृहराज्यमंत्री देसाई म्हणतात, ‘चित्रा वाघ यांच्या आरोपांना महत्त्व देत नाही’

    सातारा : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सातारा येथे गृह विभागाच्या कामकाजावर जे आरोप केले आहेत, ते अपुर्‍या माहितीच्या आधारावर आहेत. वास्तविक महिला उपशिक्षिकेने तक्रार दिल्यानंतर संबंधित गटशिक्षणाधिकार्‍याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी यात कोणतीही ढिलाई केली नसून तपासात कोणतीही त्रुटी न राहता कठोरात कठोर शासन देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे, असे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

    सातारा येथे चित्रा वाघ यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असताना गृहखात्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला होता. तसेच महिला शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या गटशिक्षणाधिकारी धुमाळ याचे निलंबन झाले नसल्याने पालकमंत्री व गृहराज्य मंत्र्यांवर सडकून टिका केली होती. यानंतर सायंकाळी शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेवून याप्रकरणातील पोलिस दलाची भूमिका मांडली व चित्रा वाघ यांच्या आरोपांना उत्तर दिले.

    शंभुराज देसाई म्हणाले, गटशिक्षणाधिकारी धुमाळ याच्याविरोधात संबंधित महिलेने विशाखा समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्याची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात आली. धुमाळ याचे स्टेटमेंट अद्याप रेकॉर्ड केले नाही. 26 जून रोजी संबंधित शिक्षिकेने सातारा येथे पोलिस ठाण्यात धुमाळ याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर हा विषय गृहविभागाकडे आला. पोलिसांनी धुमाळला 27 रोजी ताब्यात घेतल्यानंतर त्याने तब्येत बरी नसल्याचे कारण सांगितले. त्यामुळे त्यास एक दिवस जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याची तपासणी करण्यात आली. तो ठीक असल्याचा अहवाल येताच पोलिसांनी त्यास अटक करून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास जामिन मिळाला आहे. तथापि, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात कोणतीही त्रुटी न राहणार नाही, याची दक्षता घेतलेली आहे. सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या देखरेखीखाली एपीआय चौधरी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

    दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखाते 24 बाय 7 कार्यरत आहे. मात्र, भाजपला महाविकास आघाडीची बदनामी करण्याव्यतिरिक्त कोणतेही काम उरले नाही. त्यामुळे अशा आरोपांना महत्व दिले जात नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

    महाविकास आघाडीचे काम योग्य रितीने

    महाविकास आघाडीचे सरकार योग्य रितीने काम करत आहे. परंतु, भाजपला सरकारची बदनामी करण्याव्यतिरिक्त काही कामच उरलेले दिसत नाही. सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले आहे. देशातील कायदा सुव्यवस्था राखण्याला ठाकरे सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या काळात मी 13 जिल्ह्याचे दौरे करून फिल्डवर काम केले आहे. या लॉकडाऊनमध्येही 9 जिल्ह्यात जावून पोलिस दलातील बैठका, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी फिल्डवर काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येवून चित्रा वाघ जे बोलल्या ते अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलल्या. त्याला आपण फारसे महत्त्व देत नाही, असा टोलाही देसाई यांनी लगावला.

    पवारसाहेबांवर टीकेची ती रिअ‍ॅक्शन

    शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. महाविकास आघाडीचे ते मार्गदर्शक आहेत. पवारसाहेबांनी देशाच्या कषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. अशा सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्त्वावर टीका करण्याअगोदर पडळकरांनी अगोदर स्वतः कोण आहोत ते जरा तपासावे. जशी अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन असते तसेच पवार साहेबांवर आरोप झाल्यानंतर पडळकरांच्या कारच्या काचा साहेबांवर प्रेम करणार्‍यांनी फोडल्या, असेही देसाई म्हणाले.