लॉकडाऊन मागे न घेतल्यास आंदोलन करु; म्हसवडकर व्यापाऱ्यांचा इशारा

  म्हसवड : कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विचार करुन प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी आज (सोमवार) म्हसवड प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेला यापूर्वीचा आदेश पूर्ववतच ठेवला आहे. परिणामी, सातारा जिल्हा अंशतः अनलॉक झाला असला तरी माण तालुक्यातील म्हसवड शहरास २९ गावे अद्यापही लॉकडाऊन असल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रांताधिकाऱ्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी म्हसवडकर व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  राज्यभरात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने राज्य शासनाने लॉकडाउनची नियमावली शिथिल करत राज्यभरातील विविध जिल्ह्यांचे पाच टप्पे केले आहेत. यामध्ये सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यासाठी नवीन अनलॉक नियमावली रविवारी जाहीर केली आहे. यानुसार नवीन आदेशाची अंमलबजावणीस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे.

  दरम्यान, माण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या म्हसवड शहरात मात्र गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हसवड शहराला भेट दिली. त्यावेळी येथील व्यापारी वर्गाने आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना शहर अनलॉक करण्याबाबत निवेदन देत शहरातील बाधितांची १० दिवसांची आकडेवारी त्यांच्यासमोर मांडली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ७ तारखेपर्यंत सर्वांनाच थांबण्याची विनंती केली होती. त्यामुळे सोमवारपासून म्हसवड शहर अनलॉक होईल, अशी अपेक्षा सर्व व्यापारी वर्गासह शेतकऱ्यांना होती. त्यानुसार अनेक व्यापाऱ्यांनी सोमवारी आपली दुकानेही सुरु केली होती. मात्र, अचानक म्हसवड पालिकेने शहर कंन्टेटमेंट झोन असल्याचे कारण पुढे करीत सुरु झालेले शहर पुन्हा बंद केल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

  पालिकेच्या या निर्णयाविरोधात शहरातील सर्व घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देत पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे एक निवेदन दिले. मंगळवारपासून शहर सुरु न झाल्यास पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

  माण तालुक्यात लॉकडाऊन फक्त व्यापाऱ्यांसाठीच का?

  माण तालुक्यातील म्हसवड हे सर्वात मोठी बाजारपेठ असलेले शहर असून, येथील बाधितांची संख्या ही अत्यल्प आहे. तर येथील बाजारपेठ ही गेल्या २ महिन्यांपासून पूर्णत: बंद आहे. अशावेळी शहरातील २ नंबरचे सर्व धंदे मात्र राजरोसपणे सुरु असून वाळू तस्करीही जोमात सुरु आहे. मग व्यापारी वर्गासाठीच फक्त लॉकडाऊन आहे का? असा संतप्त सवाल म्हसवड येथील व्यापारी वर्गातून विचारला जात आहे.

  किरकोळ व्यापारी व मजूर वर्गाचे हाल 

  म्हसवड शहरात गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु असल्याने शहरातील बाजारपेठ ठप्प आहे. त्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्या मजूर वर्गाचे व किरकोळ व्यापाऱ्यांचे मोठे हाल सुरु असून, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, याचा प्रशासनाने विचार करावा अशी मागणी होत आहे.

  जिल्ह्यात वेगवेगळे निर्णय का?

  म्हसवड शहराला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गेल्या आठवड्यात भेट दिली असताना येथील व्यापाऱ्यांनी शहर सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हसवड शहरातील बाधितांचे प्रमाण पुढील ८ दिवस तपासून निर्णय घेतला जाईल, असे सांगून ८ तारखेपर्यंत थांबण्याची विनंती व्यापारीवर्गाला केली होती. गेल्या ८ दिवसांत शहरातील बाधितांची आकडेवारी ही अत्यंत कमी असतानाही म्हसवड शहर लॉकडाऊन तर जिल्ह्यातील इतर शहरे मात्र अनलॉक असा वेगवेगळा निर्णय एकाच जिल्ह्यात कसा काय? अशीही चर्चा व्यापारी वर्गात सुरु आहे. प्रशासन म्हसवड शहराबाबत दुजाभाव करीत आहे का ? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.