भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा साताऱ्यात स्वबळाचा नारा

    सातारा : पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकत वाढली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील, असा रोखठोक निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला.

    सदर बझार येथील पक्ष कार्यकर्त्यच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. सातारा जिल्हयातील विधानसभा मतदारसंघ व बूथरचना निहाय मंडल प्रमुखांशी पाटील यांनी संवाद साधत सर्व प्रश्नांचा तब्बल पाच तास आढावा घेतला. आगामी सातारा जिल्हा सहकारी बँक, पालिका निवडणूका या तयारीच्या अनुषंगाने पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी सविस्तर चर्चा केली.

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, डॉ अतुल भोसले, शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपजिल्हाप्रमुख सदाशिव खाडे, ऍड. भरत पाटील यावेळी उपस्थित होते .

    पाटील पुढे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात भाजप ने बूथ कमिटयांच्या माध्यमातून संघटनात्मक विस्तार केला आहे . कार्यकर्त्यांनी बैठकीत केलेल्या आग्रहानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका या स्वबळावर व पक्ष चिन्हावर लढविल्या जातील त्यासाठी कोणत्या आघाड्यांची गरज नाही. सातारा जिल्ह्यातील 2978 बूथ कमिट्यांची रचना 7 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करा आणि सगळ्यांनी सक्षमपणे तयारी लागा असा कानमंत्र चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.