आम्ही म्हसवडकर टीमला सर्वोतोपरी मदत करणार : डॉ. नितीन वाघमोडे

    म्हसवड : म्हसवड शहरात गतवर्षापासून लोकसहभागातून आम्ही म्हसवडकर टीमने सुरु केलेल्या कोरोना सेंटरमुळे जवळपास शहर व परिसरातील २ हजार लोकांना याचा लाभ झाला. त्यामुळे येथील सेंटर हे कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरले असून, जिल्ह्यातील एक आदर्श सेंटर म्हणूनही या सेंटरची ओळख असल्याने यापुढे कोरोना सेंटरला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन देत एक लाख रुपयांचा धनादेशही माणचे सुपुत्र व मुंबईचे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी दिला.

    म्हसवड शहरात सुरु असलेले आम्ही म्हसवडकर टीमच्या कोरोना सेंटरला डॉ. वाघमोडे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुणेस्थित माणदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयराज पिसे, कार्याध्यक्ष प्रवीण काळे, माजी अध्यक्ष अशोक माने, अभिजीत माने, संदिप सुळे या सह आम्ही म्हसवडकर टीमचे युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, अँड. अभिजीत केसकर, प्रशांत दोशी , एल. के. सरतापे, संजय टाकणे, प्रितम तिवाटणे, डॉ. राजेंद्र मोडासे,‌ डॉ. राजेंद्र शहा, डॉ. मयुरी शेळके, डॉ. रोहन मोडासे आदी प्रमुख उपस्थित होते.

    पुढे बोलताना आयुक्त डॉ. वाघमोडे म्हणाले की, सुरुवातीला कोरोना हा काही दिवसात जाईल असेच वाटत होते. मात्र, या कोरोनाने आपला असा काही मुक्काम ‌वाढवला की त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत बनले आहे. याचा परिणाम अर्थकारणावरही झाला आहे. सरकार आपल्या परीने या कोरोनाचा सामना करीत आहे. मात्र, एक वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाचे संक्रमण सुरु असल्याने कोरोनाची ही साखळी एका -दोघाने न तुटणारी आहे. त्यासाठी सर्वांनीच काळजी घेऊन या कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

    म्हसवड शहरातील आम्ही म्हसवडकर टीम हे काम गेल्या एक वर्षापासून अखंडीतपणे केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याला माझा मनापासून सलाम. कोणतेही काम हे एका ठराविक काळापुरते मर्यादित असते. मात्र, कोरोनाने या सर्व मर्यादा ओलांडत आपला तळ ठोकला आहे. याचा सामना करण्यासाठी शहरातील विविध विचाराचे तरुण एकत्र येऊन हे काम गेले वर्षभर न थकता करीत आहेत. हेच सर्वात महत्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण असे काम आहे. त्यांच्या या कार्याला यापुढे आणखी प्रोत्साहन मिळावे यासाठी मी त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना यापुढे सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे शेवटी वाघमोडे यांनी सांगितले.

    युवराज सूर्यवंशी म्हणाले की, माण तालुक्यात गेल्यावेळी पाणी फाउंडेशनने चांगले काम करीत गावागावांत पाण्याची चळवळ सुरु केली. त्याचा मोठा फायदा दुष्काळी भागाला झाला. अन् अनेक गावे ही टँकरमुक्त झाली. त्याप्रमाणेच आता गावागावांत आरोग्य चळवळ सुरु झाली पाहिजे. त्याला शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्याप्रमाणे गावे ही टँकरमुक्त झाली. त्याप्रमाणेच आता गावे ही कोरोनामुक्त गावे बनतील, असा विश्वास सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. या सेंटमध्ये लहान बाळांसाठीही स्वतंत्र बेडची निर्मीती केली असल्याचे सांगत आगामी तिसऱ्या लाटेसाठी आम्ही म्हसवडकर टीम तयार असल्याचे स्पष्ट केले.