माण राष्ट्रवादीला लागलेले गद्दारीचे ग्रहण सुटणार तर कधी?

मार्केट कमिटीच्या निवडणुकीत ही कार्यकर्त्याच्या महत्वकांक्षा मुळेच काही उमेदवारांचा पराभव झाला अन हाती येणारी सत्ता गेली त्यानंतर पराभूत झालेल्या उमेदवारांनी विरोधकांनी नाही तर पक्षातील गद्दारांनी आपला पराभव केल्याचा राग पक्षाचा चिंतन बैठकीत आळवला

    म्हसवड: सातारा जिल्ह्यात माण तालुका हा कधी काळी राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जायचा या तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय सदाशिवराव पोळ यांना माननारा मोठा वर्ग होता तर सामान्य जनतेचा त्यांच्यावर खुप मोठा विश्वास होता त्यामुळेच स्व. पोळ यांनी याच तालुक्यात एकदा नव्हे तर दोनवेळा राष्ट्रवादीचे आमदार निवडुन आणले. ज्यावेळी स्व. पोळ यांना राष्ट्रवादी ने विधानसभेची उमेदवारी दिली त्याचवेळी पक्षातील काही झारीतील शुक्राचार्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करुन पक्षाशी गद्दारी केली. त्यामुळे स्व. पोळ तात्यांचा पराभव झाला तेव्हापासून ते काल – परवा झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीपर्यंत या पक्षातील कार्यकर्त्यांच्या ऐण निवडणुकीत महत्वकांक्षा उंचावत गेल्याने त्यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षाशी गद्दारी होत आली असून त्यामुळे एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या तालुक्यात मात्र पक्षाची वाताहात होवू लागल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी श्रेष्ठींनी गद्दारांना शोधून त्यांच्यावर जालीम उपाय केला पाहिजे ही साधी अपेक्षा पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
    पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा खरे तर राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून आज ही ओळखला जातो या जिल्ह्यातील माण तालुक्याला दुष्काळी म्हणून राष्ट्रवादीने खूप काही दिले या तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांना खूप मोठी ताकत ही पक्षाने दिल्यानेच माण तालुका हा राष्ट्रवादी ची व्होट बँक म्हणून गणला जावू लागला होता. या तालुक्यातील सामान्य जनतेनेही राष्ट्रवादी पक्षावर भरभरुन प्रेम ही केले, येथील जनतेचे पक्ष प्रेम पाहुनच राष्ट्रवादीचे कुटुंब प्रमुख शरद पवार यांनी या तालुक्याचा समावेश असलेल्या माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत दिल्ली गाठली होती.

    राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून ते सन २००९ पर्यंत माण तालुका हा राष्ट्रवादी मय तालुका म्हणून राज्याच्या पटलावर गणला गेला याच काळात स्व. सदाशिवराव पोळ यांनी तुकाराम तुपे व स्व. संपतराव अवघडे यांना आमदार बनवण्याची किमया केली होती, स्व. पोळ यांना मानणारी जनता मोठ्या प्रमाणावर असल्यानेच या तालुक्यातील सर्व सत्ताकेंद्रे ही राष्ट्रवादी च्या ताब्यात होती, मात्र २००९ साली हा मतदारसंघ विधानसभेसाठी खुला झाला अन अनेक कार्यकर्त्यांच्या भावना उंचावल्या प्रत्येकालाच आमदारकीची स्वप्ने पडु लागल्याने अनेकजण मला आमदार झाल़्यासारख वाटतय हे गीत आळवू लागला मात्र हे गीत आळवता आळवता त्यांनी पक्षाचा गळाच आवळण्याचे काम केले अन राष्ट्रवादी पक्षाला येथे पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पहावे लागले, सन २००९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माण तालुक्याबरोबर खटाव तालुक्याचा १/३ भाग या मतदार संघाला जोडला गेला त्यामुळे मतदार संघाची रचना बदलून गेली माण तालुक्यासह खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी च्या मात्तबर मंडळींना येथुन प्रतिनिधीत्व करावयाचे होते. मात्र पक्षश्रेष्ठी असलेल्या पवार साहेबांचा शब्द हा आदेश मानून अनेकांनी आपल्या उमेदवाररुपी तलवारी म्यान केल्या, पण आत्ता नाही तर कधीच नाही असे ज्यांना वाटत होते त्यांनी आपल्या तलवारी म्यान न करता त्या फक्त लपवल्या अन ऐण निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी तलवारी बाहेर काढून पक्षाच्या विजयाचे दोर कापले त्यावेळी राष्ट्रवादी पक्षात झालेली गद्दारी ची फळे राष्ट्रवादीला आज ही भोगावी लागत असून त्यावेळी झालेल्या गद्दारी ची परंपरा आज ही चालुच असल्याचे नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत दिसून आले.

    माण तालुक्यात राष्ट्रवादी ची ताकत खुप मोठी आहे आज ही सर्वात बलवान पक्ष म्हणुन माण तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष ओळखला जातो या पक्षातील नेतेही मात्तबर आहेत, मात्र प्रत्येकालाच महत्वकांक्षा असल्याने ही महत्वकांक्षांच प्रत्येकवेळी आडवी येत असल्याने राष्ट्रवादीचा पराभव होत आहे. स्व. पोळ तात्यांचा पराभव झाल्यावर ही राष्ट्रवादी पक्षाने या तालुक्याला ताकत देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांना झेडपीचे अध्यक्ष पद तर झेडपीचे कृषी सभापती पद दिले तर स्व. पोळ तात्यांना विधान परिषदेवर घेत त्यांना जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद ही दिले तर काहींना संचालकपदी बसवले, तत्पुर्वी माजी आ. तुकाराम तुपे यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष पद देवून माण तालुक्याला प्रथमच लाल दिवा दिला होता, एवढे करुनही तालुक्यात पक्ष म्हणावा तेवढा उभारी घेवू शकलेला नाही. स्व. सदाशिवराव पोळ हे खरे तर पवार साहेबांचे निस्सीम भक्त मानले जायचे. त्यामुळेच पवार साहेबांना माण तालुक्याला भरभरुन पदे दिली तर स्व. पोळ तात्यांचा सन्मान राखण्यासाठी त्यांना विधानपरिषदेचीही संधी दिली मात्र पोळ तात्यांच्या जाण्याने पक्षाची येथे खुप मोठी हाणी झाल्याचे स्वत: पक्षश्रेष्ठींनी बोलुन दाखवले.  त्यानंतर पक्षाची झालेली हाणी माजी सनदी अधिकारी असलेले प्रभाकर देशमुख हे भरुन काढतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी ला वाटल्यानेच राष्ट्रवादी ने देशमुख यांना आपल्या पक्षात घेत स्व. पोळ तात्यांप्रमाणेच त्यांना ताकत दिली मात्र गत दोन वर्षापुर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांना ही पक्षातील गद्दारीचा फटका बसला अन त्यांनाही अल्प मतासाठी पराभव पहावा लागला.

    प्रत्येकवेळी पराभव झाला की राष्ट्रवादी येथे चिंतन बैठक घेते या चिंतन बैठकीत पुन्हा असे होणार नाही. अशी अपेक्षा गृहीत धरुन पुढील वाटचाल सुरु होते मात्र यावर तोडगा निघत नाही याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत पुन्हा दिसून येतो, नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीत ही कार्यकर्त्याच्या महत्वकांक्षा मुळेच काही उमेदवारांचा पराभव झाला अन हाती येणारी सत्ता गेली त्यानंतर पराभूत झालेल्या उमेदवारांनी विरोधकांनी नाही तर पक्षातील गद्दारांनी आपला पराभव केल्याचा राग पक्षाचा चिंतन बैठकीत आळवला मात्र बैठक संपली की राग ही संपतो असेच गद्दारी करणाऱ्यांना वाटत असल्यानेच पक्षाची हाणी होवू लागली असुन पक्षाची होत असलेली हाणी थांबवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरीष्ठांनी अशा गद्दारांचा शोध घेवून त्यांच्या महत्वकांक्षाची नसबंदी करुन पक्षाला लागलेले गद्दारीचे ग्रहण रोखले पाहिजे तरच माण तालुक्यात राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त होईल असा सुर तमाम राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यातून उमटत आहे.  – महेश कांबळे