जम्बाे अजेंड्याला मिळणार हिरवा कंदिल; पालिकेत विरोधकांचे विषय डावलल्याने नाराजी

तब्बल एक महिन्यापूर्वी कोरम अभावी रद्द झालेली स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. २७) ऑनलाइन पध्दतीने होत आहे.

    सातारा : तब्बल एक महिन्यापूर्वी कोरम अभावी रद्द झालेली स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि. २७) ऑनलाइन पध्दतीने होत आहे. या सभेत तब्बल ३१४ विषयांना मंजूरी देण्यात येत असून नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांचे विषय डावलले गेल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

    कोरोनामुळे सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा होत नव्हती. तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर सभेला मुहूर्त लागला. सभा ऑनलाइन असल्याने सभेत कोणतेही वाद प्रतिवाद होणार नाही, याची काळजी सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे . विशेष म्हणजे स्थायी समितीच्या सभेला ३१४ विषय घेण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व विषय मंजूर होणार परंतु त्यावर चर्चा मात्र अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सातारा पालिकेच्या स्थायी समितीमध्ये सर्व पदाधिकारी, विरोधी गटातील केवळ अशोक मोने यांचा समावेश आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेमध्ये महत्वाच्या विषयांना मंजूरी दिली जाते. समितीतील सदस्यांना अजेंडा वाटप करण्यात आला.

    सभेचा अजेंडा पाहिला असता त्यावर ३१४ विषयांचा उल्लेख असताना नगरसेविका लीना गोरे यांच्या वॉर्डातील प्रस्ताव डावलण्यात आल्याने आमदार गटात नाराजी पसरली आहे . लीना गोरे यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन आपले विषय डावलल्याची तक्रार केली . मात्र हा आघाडीचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगत नगराध्यक्षांनी मात्र हात वर केले.