महिलांनी हिंमतीने आणि आत्मविश्वासाने पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    सातारा : ज्यावेळी राक्षसांनी थैमान घातले. त्यावेळी कालिमाता, दुर्गामातेने अवतार धारण केला. आजची महिलाही गरज पडली तर कालीमातेचा अवतार धारण करू शकते. हे अपप्रवृत्तींना दाखवून द्या. महिलांनी हिंमतीने आणि आत्मविश्वासाने पुढे यावे. पोलीस दलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    सातारा येथे अलंकार हॉल येथे शुक्रवारी (दि. 16) मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शुभहस्ते महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प कार्यप्रणालीचे ऑनलाईन उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा, नगराध्यक्षा माधवी कदम, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल उपस्थित होते. मनुकुमार श्रीवास्तव मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचाललक संजय पांडे, विशेष पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग) यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपले रक्षक असलेले पोलिस 20-20 तास ताणतणावाची ड्युटी करत असतात. उन्ह, वारा, पावसाची तमा न बाळगता, स्वतःच्या जीवाचा विचार न करत कर्तव्य बजावत असतात. आपल्यासाठी चिंता वाहणारे अनेक पोलिस कोरोनाबाबत कर्तव्य बजावताना आपल्यातून निघून गेले आहेत. अनेकजण कोरोनाबधित झाले, याची सरकारला जाणीव आहे. सध्या महिला पोलिस रक्षकाची भूमिका बजावत असतानाच दुसऱ्या बाजूला समाजात अत्याचार पीडित महिलाही असल्याचे विरुद्ध चित्र दिसत आहे. एका बाजूला आपण मातृभक्त छत्रपती शिवरायांना दैवत मानतो. त्यांच्याबद्दल आपल्याला असलेली भक्ती, श्रद्धा आणि त्यांचा आदर्श आपल्यासमोर असावा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करतो.

    राजमाता जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले अशा अनेक कर्तृत्ववान महिलांबाबत खूप काही बोलतो. तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, प्रतापगडची भवानीदेवी, दुर्गामाता अशा मातृशक्तींची आराधना करतो. दुसऱ्या बाजूला महिलांच्या संरक्षणासाठी आपल्याला कायदा करावा लागतोय हीच लाजीरवाणी गोष्ट आहे. आपले संस्कार आपल्या आचरणात का येत नाहीत? का कायदा करावा लागतो. का माता भगिनींना संरक्षणाचे धडे द्यावे लागत आहेत? तथापि, आज सातारा पोलिस दलाने पुढाकार घेवून जो पथदर्शी उपक्रम राबवला ही समाधानाची बाब आहे.

    जगभरात कोरोना सुरू असताना महाराष्ट्र महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. आपलं एक पाऊल बरचं काही करू शकतो. यापुढे प्रत्येक पावलागणित महाराष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे. यापुढे राज्यातील प्रत्येक महिला जर गरज पडली तर कालीमातेचा अवतार धारण करू शकते, हे महिलांनी दाखवून द्यावे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.