अखेर य.मो. कृष्णा कारखान्यात पुन्हा भोसले गटाने मारली बाजी

    सातारा : कृष्णा कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम संपला आणि कृष्णाकाठच्या सभासदांनी पुन्हा विद्यमान सत्ताधाऱ्यांच्याच हातात कृष्णेची सुत्रे दिली. विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वावर कृष्णेच्या सभासदांनी विश्वास दाखवला आणि भरघोस असं यश भोसलेंच्या सहकार पॅनेलला मिळाले.

    कृष्णा कारखान्यावर पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच संधी मिळाली. याचे कारण कृष्णा कारखान्याचा डॉ. सुरेश भोसले यांनी केलेला पारदर्शी कारभार आहे. अशी चर्चा सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातल्या सभासदांची निकाल हाती पडल्यानंतर सुरु झाली. मतमोजणी सुरु होईपर्यंत संस्थापक पॅनेल आणि सहकार पॅनेलमध्ये जोरदार टक्कर होणार असं मत अनेकजण व्यक्त करत होते. मात्र, जसजशी मतमोजणी पुढे जावू लागली. तसे एक चित्र तयार होत गेले. पहिल्या फेरीचे निकाल हाती येत राहिले. तेव्हा सहकार पॅनेलने जोरदार मुंसडी मारण्यास सुरुवात केली. सर्वच्या सर्व गटांमध्ये सहकार पॅनेलची सरशी दिसू लागली. तर संस्थापक पॅनेल दुसऱ्या स्थानावर आणि रयत पॅनेल हे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली. तेव्हा सर्व गटात पाच हजाराहून अधिक मतांची आघाडी सहकार पॅनेलने घेतली आणि त्याच वेळेला कृष्णेच्या चाव्या पुन्हा सत्ताधाऱ्यांच्याच हातात येणार हे स्पष्ट झाले.

    पहिल्या फेरीत मिळालेली आघाडी कायम राखत दुसऱ्या फेरीतही सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण निकाल हाती येतेवेळी सहकार पॅनेलने ११ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केल्याचे चित्र स्पष्ट झाले. संस्थापक पॅनेल आणि रयत पॅनेलला सभासदांनी साफ नाकारल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले. दुसरी बाब दोन्ही मोहिते गट एकत्र आले असते तरी सहकारला टक्कर देणे त्यांना सोपे झाले नसते. हे दोन्ही फे-यांमधील सर्व गटातील मतांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.

    निकालानंतर विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी हा ऐतिहासिक विजय असून, मिळालेली मते पाहता यापुढे जबाबदारीही वाढल्याचे मत व्यक्त केले. तर डॉ. अतुल भोसले यांनी सभासदांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवल्याची प्रतिक्रिया दिली. एकूणच कोणताही अनुचित प्रकार न घडता कृष्णेचा रणसंग्राम तूर्तास तरी थांबला आहे. आता येणाऱ्या काळात सभासदांनी पुन्हा दाखवलेला विश्वासाची मोठी जबाबदारी डॉ. सुरेश भोसले यांच्यावर असणार आहे.