एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला; प्रवाशांच्या पासपोर्टसह क्रेडिट कार्डचा डेटा लीक; आकडेवारी ऐकाल तर थक्क व्हाल

या सायबर हल्ल्यात अनेक प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे. यात जवळपास ४५ लाख प्रवाशांचा डेटा चोरी करण्यात आला आहे. यात देशासह परदेशातील प्रवाशांच्या माहितीचा समावेश आहे.

  नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील विमानसेवा कंपनी असलेल्या एअर इंडिया (Government Airlines Air India) च्या प्रवाशांचा (Passengers) चा डेटा लीक (Data Leak) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर मोठा सायबर हल्ला (Cyber Attack) झाला आहे. या सायबर हल्ल्यात प्रवाशांचे वैयक्तिक तपशीलही चोरीस गेले आहेत. ज्यात क्रेडिट कार्ड, पासपोर्टसह इतर माहितीचा समावेश आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कंपनीच्या डेटा सेंटरवर झालेला हा सायबर हल्ला यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला आहे. नुकतंच एअर इंडियाने त्यांच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्यात अनेक प्रवाशांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे. यात जवळपास ४५ लाख प्रवाशांचा डेटा चोरी करण्यात आला आहे. यात देशासह परदेशातील प्रवाशांच्या माहितीचा समावेश आहे.

  एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट २०११ ते ३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान प्रवाशांचा डेटा लीक झाला आहे. यात जन्म तारीख, नाव, संपर्क, पासपोर्टची माहिती, तिकिटाची माहिती, पासवर्ड आणि क्रेडिट कार्ड संबंधी माहितीचा समावेश आहे. आम्हाला डेटा प्रोसेसरकडून या संदर्भातील पहिली माहिती २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मिळाली होती. यानुसार २५ मार्च २०२१ ते ५ एप्रिल २०२१ पर्यंतचा आकडेवारीवर परिणाम दिसत आहे.

  ‘SITA PSS द्वारे डेटाची चोरी’

  हा डेटा SITA PSS द्वारे चोरी झाला आहे. हा डेटा प्रोसेसर प्रवाशांच्या सेवेसाठी काम करतो. तसेच प्रवाशांचा डेटा साठवून ठेवण्याची आणि तो प्रोसेस करण्याची जबाबदारी त्यावर असते. डेटा लीक प्रकरणात कोणत्याही प्रवाशाच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरी झाली आहे. मात्र यात CVV नंबरच्या डेटाची चोरी झालेली नाही. हा सर्व्हर हॅक झाल्यानंतर त्याची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे.

  सायबर हल्ल्याची तातडीने चौकशी

  या सायबर हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही तातडीने चौकशी केली आहे. या हल्ल्यामुळे प्रभावित झालेले सर्व्हर सुरक्षित करण्यात आले आहे. त्याशिवाय विविध क्रेडिट कार्डधारकांशी याबाबत संपर्क साधला असून त्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच एअर इंडियाने एफएफपी प्रोग्रामसाठी वापरला जाणारा पासवर्ड रिसेट केला आहे.

  air-india-servers-hacked-massive-cyberattack-data-leaks-most-important-info-of-air-india-passengers stolen