देशातील सर्वात श्रीमंत मंदिराची ख्याती आणखी वाढणार कारण… तुम्ही म्हणाल लय भारी संशोधन, चालतंय की

मंदिरात लाडूसाठी बायोडिग्रेडेबल बॅग काउंटर सुरू करण्यात आले आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे (DRDO) अध्यक्ष जी सतीश रेड्डी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी रविवारी या बायोडिग्रेडेबल बॅग काउंटरचे उद्घाटन केले.

  तिरुपती : देशातील सर्वात श्रीमंत श्री क्षेत्र तिरुपती बालाजी मंदिराच्या ख्यातीत आणखी भर पडणार आहे. नेहमीच विशेष अशा कारणांमुळे हे श्रद्धास्थान भाविक भक्तांसाठी चर्चेचा विषय ठरत असते. मंदिर ट्रस्टने आता नवीन निर्णय जाहीर केला आहे. त्याला कारणही तसंच लय भारी आहे. प्लास्टिकच्या भस्मासूराचा नायनाट करण्यासाठी भक्तांना मिळणारा प्रसाद आता बायोडिग्रेडेबल बॅगेतून मिळणार आहे.

  मंदिरात लाडूसाठी बायोडिग्रेडेबल बॅग काउंटर सुरू करण्यात आले आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे (DRDO) अध्यक्ष जी सतीश रेड्डी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी रविवारी या बायोडिग्रेडेबल बॅग काउंटरचे उद्घाटन केले. दरम्यान, या पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल बॅग डीआरडीओने तयार केल्या आहेत.

  संशोधन ठरणार पर्यावरण पूरक

  हैद्राबादमध्ये DRDO च्या अत्याधुनिक बायोडिग्रेडेबल बॅग बनवण्यासाठी अनेक संशोधन आणि प्रयोग केले आहेत. पर्यावरणाशी सुसंगत अशा गोष्टी बनवण्यासाठी DRDOचे संशोधन अद्यापही सुरूच आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही कॉर्न स्टार्चपासून पर्यावरण पूरक बॅग तयार केली आहे. ही बॅग ९० दिवसांनंतर आपोआप खराब होते. तसेच, पर्यावरणात मिसळून जाते. जनावरांनी ही बॅग खाल्ली तरी काहीही समस्या उद्भवत नाही, असे DRDOच्या अध्यक्षांनी सांगितले.

  बायोडिग्रेडेबलची बॅगची सुरूवात

  बायोडिग्रेडेबल बॅगची सुरूवात एक पर्यावरणपूरक पर्याय आहे. हे प्रोडक्ट मानव जातीच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. काही दिवस भक्तांची प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर याची विक्री पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचे डॉ. के. एस. जवाहर रेड्डी यांनी म्हटले आहे.

  प्लास्टिक बॅगच्या वापरावर आहे बंदी

  २०१९ पर्यंत तिरुमला तिरुपती देवस्थानकडून सिंगल यूज प्लास्टिकचा मोठ्या संख्येने वापर केला जात होता. २०१४-२०१८ दरम्यान येथील लाडूसाठी भाविकांना ९.६३ कोटी पॉलिथीनचे वाटप करण्यात आले होते. तत्कालीन अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सिंगल युज प्लास्टिक बॅगच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.