WhatsApp ने केली 30 लाख अकाउंट्स बॅन, Ban करण्यामागे दिलंय ‘हे’ कारण

आमच्या प्लॅटफॉर्मवर युजर्सला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा शास्त्रज्ञ, इतर तज्ञ आणि अनेक प्रक्रियांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे.

    नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आता नव्या आयटी नियमाचं पालन करण्यास सुरुवात देखील केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात आपला पहिला सुरक्षा रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये, व्हॉट्सअ‍ॅपने 15 मे ते 15 जून दरम्यान भारतात कमीत-कमी दोन मिलियन अकाऊंट बॅन केल्याची माहिती दिली आहे.

    आता यासंबंधित दुसऱ्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने 45 दिवसांच्या आत भारतात 30 लाखहून अधिक अकाऊंट बॅन केली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 16 जून ते 31 जुलैपर्यंत केवळ 46 दिवसांत 3,027,000 अकाऊंट बॅन केली आहेत.

    16 जून ते 31 जुलैपर्यंत WhatsApp ने 30 लाख अकाऊंट बॅन केली आहेत. रिपोर्टनुसार, एका भारतीय अकाऊंटची ओळख +91 फोन नंबरवरून करण्यात येते. सर्वाधिक 95 टक्के व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट बॅन होण्यामागे ऑटोमेटेड किंवा स्पॅम मेसेजिंगचा चुकीचा वापर करणं हे कारण आहे. 16 जून ते 31 जुलैदरम्यान, 594 युजर्सनी रिपोर्ट केलं आहे. त्यानुसार 74 अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे.

    WhatsApp च्या प्रवक्त्यांनी सांगितलं, की आमच्या प्लॅटफॉर्मवर युजर्सला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा शास्त्रज्ञ, इतर तज्ञ आणि अनेक प्रक्रियांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे.

    भारतात युजर्सकडून दोन प्रकारच्या तक्रारी आल्या. व्हॉट्सअ‍ॅपच्या भारतातील तक्रार अधिकाऱ्याला पाठवलेल्या ईमेलद्वारे व्हॉट्सअ‍ॅपच्या नियम-अटींचं उल्लंघन किंवा मदत केंद्रात प्रकाशित केलेल्या आणि इतर पोस्टद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटबाबतचे प्रश्न यासंबंधी ईमेल आले आहेत.