ट्रूकॉलरला निर्माण होणार तगडी स्पर्धा, आलंय पहिलं स्वदेशी ॲप; प्रत्येकाने इन्स्टॉल करायलाच हवं!

आपला फोन जेव्हापासून ‘स्मार्ट’ झाला तेव्हापासून कोणतीही माहिती मिळवणं एका क्लिकवर मिळणं सहज शक्य झालं आहे. निनावी नंबर वरून आलेला फोन कोणाचा असेल? कोणत्याही कारणामुळे उचलता न आलेला फोन कोणाचा असेल? आलेला फोन विशिष्ट व्यक्तीचा आहे का? हे सर्व ‘ट्रु कॉलर’मुळे आपल्याला शोधायच्या आधीच सापडतं.

    मुंबई : ‘मेक इन इंडिया’चा (Make In India) सगळीकडे बोलबाला सुरु असल्याने जास्तीत जास्त मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile applications) सुद्धा भारतीय (Indian) असावीत अशी आता सर्वांचीच इच्छा आहे. आयटी क्षेत्राने (It Sector) या गोष्टीची दखल घेतली असून त्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच १५ ऑगस्ट २०२१ पासून ‘भारत कॉलर’ (Bharat caller) हे आपलं भारतीय ॲप्लिकेशन ‘ट्रू कॉलर’ला (True caller) पर्याय म्हणून आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

    दहा दिवसांपूर्वी गुगल प्लेस्टोर आणि ॲपलवर उपलब्ध करून दिलेल्या ‘भारत कॉलर’ला ६००० पेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड करून वापरायला सुरुवात केली आहे. भारतीय कंपनी ‘किकहेड सॉफ्टवेयर्स’ने ‘भारत कॉलर’ची निर्मिती केली आहे.
    ‘किकहेड सॉफ्टवेयर्स’ (KickHead Softwares Pvt. Ltd) या आयटी कंपनीला २०२० मध्ये ‘शैक्षणिक’ क्षेत्रातील सर्वात चांगले ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ‘स्टार्टअप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलं आहे. आयआयएम बँगलोरचा विद्यार्थी प्रज्वल सिन्हा ही कंपनी २०१८ मध्ये सुरू केली होती.

    कसं आहे ‘भारत कॉलर’?

    नंबर कोणाचा आहे हे सांगण्यासोबतच ‘भारत कॉलर’ हे ॲप्लिकेशन तुम्हाला आलेल्या बनावट, धोकादायक नंबर्सची सुद्धा आपल्याला माहिती देणार आहे.

    ‘भारत कॉलर’ची आवश्यकता काय?

    २०१७ मध्ये भारतीय संरक्षक दलाच्या असं लक्षात आलं होतं, की अमेरिकेचं ‘ट्रु कॉलर’ हे आपल्या सैनिकांची वैयक्तिक माहिती चोरत आहे.

    भारतीय आर्मीने त्वरित सर्व सैनिकांना ‘ट्रु कॉलर’ आपल्या मोबाईलमधून काढून टाकण्याचे आदेश दिले. भारत सरकारने बदल सुचवूनही लोकांना सेवा देतांना त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये रस असलेल्या ‘ट्रु कॉलर’ने त्यांच्या कामाच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यास सहकार्य केलं नाही.

    हे लक्षात आल्यावर भारतीय आयटी कंपन्यांना ‘ट्रु कॉलर’ सारखं काम करणारं आणि लोकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी न करणारं ॲप्लिकेशन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

    जानेवारी २०२१ मध्ये ‘ट्रु कॉलर’चा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आणि अवघ्या ७ महिन्यात ऑगस्ट २०२१ मध्ये ‘भारत कॉलर’ या ॲप्लिकेशनचं तज्ज्ञांच्या सहाय्याने लोकार्पण करण्यात आलं आहे. एकूण ९ जणांच्या टीमवर्कने हे ॲप्लिकेशन इतक्या कमी वेळात लोकांच्या सेवेत हजर झालं आहे.

    ‘भारत कॉलर’मध्ये काय आहे खास?

    ज्यांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे आणि त्यांच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला नसेल, तरी त्यांचं नाव तुम्हाला ‘भारत कॉलर’द्वारे आपल्याला स्क्रीनवर लगेच दिसणार आहे.

    तुम्ही ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर जे नाव, नंबर टाईप कराल तेच नाव ‘भारत कॉलर’ तुमच्या नावाने सेव्ह करेल आणि त्यासाठी इतर कोणताही शोध करणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

    ‘भारत कॉलर’ वापरत असताना तुमचं नाव हे कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह केलं जाणार नाही, हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. हे ॲप्लिकेशन सध्या ५१ हजार कॉल्ससाठी वापरण्यात आलं आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे.

    सध्या या ॲपचा वापर भारतापुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. इंग्रजी, हिंदी, तामिळ, गुजराती, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये ‘भारत कॉलर’चा वापर केला जाऊ केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय ॲप्लिकेशन इतके फीचर्स नसले तरीही तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी ‘भारत कॉलर’ हे सर्वात सुरक्षित आहे असं कंपनीने सांगितलं आहे. हे ॲप आतापर्यंत ६००० जणांनी डाऊनलोडही केलं असून त्याची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.

    लोकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी होऊ नये, यासाठी ‘किक हेड सॉफ्टवेयर्स’ त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला लोकांची माहिती बघण्याची परवानगी दिलेली नाहीये. कंपनीने मुंबईमध्ये एक सर्व्हर बसवलं आहे ज्याची अगदीच मोजक्या लोकांना माहिती आहे. या सर्व्हरची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी कंपनी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. या कामात सरकारच्या मदतीची सुद्धा प्रज्वल सिन्हा यांना अपेक्षा आहे.

    ‘भारत कॉलर’च्या आधी या कंपनीने ‘भारत स्कॅनर’ नावाने ॲप्लिकेशन तयार केलं आहे. चीनच्या ‘कॅम स्कॅनर’ला सर्वोत्तम पर्याय म्हणून ग्राहकांनी त्या ॲप्लिकेशनला गुगलवर चांगले रेटिंग दिले आहेत.

    तुमची माहिती स्वतःकडे न ठेवता सर्व्हर वरून लोकांपर्यंत खऱ्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव पोहोचवणाऱ्या ‘भारत कॉलर’ही आपण आजच डाउनलोड करायला पाहिजे. आपलं प्रत्येक डाउनलोड हे आपल्या भारतीय आयटी क्षेत्रातील लोकांना अजून असे लोकोपयोगी ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी प्रोत्साहन देईल हे लक्षात घ्यायला हवं.