नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ‘नॉट रिचेबल’; ४ दिवसांपासून सेवा ठप्प, जाणून घ्या सविस्तर

लाखो रुपये खर्च करून उमरी शहरात बीएसएनएलचे कार्यालय अत्याधुनिक यंत्रणेसह उभे करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे या कार्यालयाचा कारभार भोकरहून चालतो. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी उमरीच्या ग्राहकांकडे लक्ष दिले नाही.

    नांदेड : देशात सर्वात मोठ्या नेटवर्कचे जाळे असलेली सरकारी कंपनी बीएसएनएलची सेवा गेल्या चार दिवसापासून शहर व परिसरात ठप्प झाली आहे. खंडित झालेल्या सेवेमुळे परिसरातील जवळपास दोन हजार ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून बीएसएनएलची सेवा ग्राहकांना देण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असले तरी अनेक खाजगी कंपन्यांनी आपले नेटवर्कचे जाळे पसरविल्याने बीएसएनएलचे अनेक ग्राहक कमी झाले आहेत.

    उमरी ते भोकर मार्गावर असलेली फायबर केबल तुटल्याने मेन लाईन बंद झाली आहे. त्यामुळे उमरी व परिसरातील बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे. सध्या धर्माबाद येथून लाईन चालू करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा हा प्रयत्न असफल झाला आहे. त्यामुळे बीएसएनएलची सेवा खंडित झाली आहे. लाखो रुपये खर्च करून उमरी शहरात बीएसएनएलचे कार्यालय अत्याधुनिक यंत्रणेसह उभे करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे या कार्यालयाचा कारभार भोकरहून चालतो. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी उमरीच्या ग्राहकांकडे लक्ष दिले नाही.

    उमरी व परिसरात शासकीय कार्यालयासह हजारो ग्राहक बीएसएनएल कंपनीचे आहेत, सर्व कारभार पाहण्यासाठी एका जेटीओची नेमणूक करण्यात आली. परंतु नेमणूक करण्यात आलेले अधिकारी उमरी शहरात येत नसून ते भोकर येथूनच कारभार पाहतात. इतर खाजगी कंपन्या आमिषे, सवलती देत ग्राहक संख्या वाढवत आहेत. मात्र बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नांदेडकरांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.