मुंबईतील हरित कवच घटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली

मुंबई: मुंबईतील पाणथळ (Wetlands in Mumbai) भागाच्या संरक्षणा (protection) साठी कायद्याचा आधार कसा घेता येईल यावर चर्चा करण्यासाठी एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध पर्यावरणवादी(Environmentalist), मुंबई उच्च न्यायालयाचे वकील (mumbai high court advocates) आणि शहरातील कायद्याचे विद्यार्थी (law students) एकत्र आले होते. वातावरण फाउंडेशन (vatavaran foundation) च्या वतीने ‘बायोडायव्हर्सिटी बाय द बे’ या अभियानाअंतर्गत आयोजित या वेबिनार (webinar) मधून तरुण प्रगतीशील मुंबईकरांची चळवळ उभी करावी जे पर्यावरणाविषयी कृतीशील आणि सर्वसमावेशक चर्चा करतील, जेणेकरून मुंबईभोवतीचे हरित कवच व जैवविविधतेचे रक्षणही केले जाईल.

सुप्रसिद्ध पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद आणि वरिष्ठ वकील गायत्री सिंह तसेच मुंबई उच्च न्यायालयातील वकील झमान अली यांनी मुंबईतील सध्याच्या पाणथळ भागांचे व्यवस्थापन व संरक्षण आणि शाश्वत अशी धोरणे तयार करण्यासाठी सल्ला देताना करण्याच्या तयारीसाठी आताच्या कायद्यातील कोणत्या गोष्टींचा आधार घेता येईल याची सखोल व सविस्तर चर्चा केली.

“‘या कार्यक्रमामुळे भावी पिढीतील वकिलांना पर्यावरणासंबंधीचे कायदे आणि त्यापुढील आव्हाने खूप चांगल्या पद्धतीने समजतील. आज आपल्या देशात जे काही जैववैविध्य बाकी आहे त्याचे संरक्षण न्याय व्यवस्थाच करू शकते. मुंबईचा नैसर्गिक वारसा, नैसर्गिक संपत्ती अतिशय गतीने लुप्त होत चालली आहे. तरुणाईने विशेषत: तरुण वकिलांनी कृतिशीलपणे आणि संरक्षणाबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे,’’ असे मत वनशक्तीचे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केले.

स्प्रिंगर नेचर मुंबई या जर्नलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईभोवतीच्या हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली आहे. १९८८ मध्ये मुंबईच्या एकूण ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते, जे २०१८ मध्ये १६,८१४ हेक्टर इतकेच राहिले आहे. ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले आहे, हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठा आहे. हे कवच नष्ट झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे, कार्बन उत्सर्जन वाढले आहे आणि पूरपरिस्थितीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जागतिक तापमान वाढ, अनियोजित विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे असे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी आणि या विषयातील तज्ज्ञांचे मत आहे.

“उलटपक्षी विकासाचे स्वागतच आहे पण पर्यावरणाचा बळी देऊन ती व्हायला नको. आपल्या भोवतालच्या जैवविविधतेकडे आपण कानाडोळा केला तर त्याची किंमत आपल्या भावी पिढीला मोजावी लागेल. आता मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये पूर येणारच हे गृहितच झाले आहे. आपण आताच कृती केली नाही तर नंतर खूप उशीर होईल. बायोडायव्हर्सिटी बाय द बे अभियानाच्या माध्यमातून आम्ही या पर्यावरणाच्या विषयांकडे किती तातडीने लक्ष देण्याची गरज आहे याकडे लोकांचे लक्ष आकर्षित करायचा प्रयत्न करत आहोत. आदित्य ठाकरे यांच्यासारखे तरुण तडफदार पर्यावरणमंत्री आपल्याला लाभले आहेत. मुंबई महानगर प्राधिकरणामध्ये येणाऱ्या सर्व हरित प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी आमची इच्छा आहे. पर्यावरणासंबंधी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आम्ही राजकारणी, सनदी अधिकारी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करण्यास तयार आहोत,’’ असे वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभाट यांनी सांगितले.

पुरापासून मुंबईचा बचाव करण्यासाठी इथली खारफुटी प्रचंड महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन शोषण्याचेही ती काम करते. ‘द बेनिफिट्स ऑफ फ्रिंजिंग मॅनग्रूव्ह सिस्टिम्स टू मुंबई’ ‘The benefits of fringing mangrove systems to Mumbai’ या अभ्यासानुसार ही खारफुटी दरवर्षी मुंबई शहरासाठी जे काम करतात त्याची किंमत ७.७३ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी होते. विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होण्याची मोठी भीती आहेच अशा परिस्थितीत एमएमआर क्षेत्रातील विकासादरम्यान खारफुटीचे संरक्षण करणे आवश्यक आहे असे CRZ 2011 या कायद्यात आहे. त्यामध्ये मे २०२० मध्ये सुधारणाही केलेली आहे. असे खारफुटीचे रक्षण करणारे कायदे अस्तित्वात आहेत.

मुंबईतील हरित परिसर व जैवविविधता यासाठी मुंबईतील कायदेतज्ज्ञांनी लढा द्यावा या उद्देशाने वेबिनार आयोजित केला होता. भविष्यातील निसर्गाची काळजी घेण्याबाबत मुंबईतील तरुणाईला शिक्षण देणे गरजेचे आहे. मुंबईतील स्थानिक संघटना आणि मुंबईची चिंता करणारे नागरिक यांनी एकत्रितपणे विकसित केलेले द बायोडायव्हर्सिटी बाय द बे हे अभियान मुंबईतील तरुणाईने सामूहिक कृतीने पर्यावरण बदलाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित व्हावे या उद्देशाने सुरू केले आहे. आपल्या जैवविविधतेचे अधिक चांगले रक्षण करण्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील तरुणाईला तयार करण्याच्या दृष्टिने अनेक कार्यक्रमाचे नियोजन केले आहे त्यापैकी हा पहिलाच कार्यक्रम होता.