नव्या मॉडेल्समध्ये नेमके काय नवे?

आयफोनचे नवे मॉडेल हा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. नव्या मॉडेलमध्ये नवे तंत्रज्ञान देणे, ही आयफोनची खासियत आहे. नुकत्याच अनावरण झालेल्या चार मॉडेल्समध्येदेखील अशीच उत्कंठावर्धक वैशिष्ट्ये आहेत.

जगप्रसिद्ध मोबाईल हँडसेट कंपनी आयफोननं (Iphone) बहुप्रतिक्षित आयफोन 12 (Iphone 12) चे शानदार अनावरण केले. विशेष म्हणजे आयफोन 12 चे चार वेगवेगळे मॉडेल्स एकाच वेळी बाजारात उपलब्ध होणार आहेत. आयफोन 12 प्रो (Iphone 12 pro), आयफोन 12 प्रो मॅक्स (Iphone 12 pro max),  द आयफोन 12 (The Iphone 12) आणि आयफोन 12 मिनी (Iphone 12 mini) अशी या मॉडेल्सची नावे आहेत. ३० ऑक्टोबरपासून भारतात हे म़ॉडेल्स उपलब्ध होतील. जाणून घेऊया या चारही मॉडेल्सची वैशिष्ट्यं.

आयफोन 12 प्रो

ट्रिपल कॅमेरा सेटअप हे या मॉडेलचं वैशिष्ट्य आहे. मोबाईलच्या पाठीमागील बाजूला हा कॅमेरा सेटअप बसवण्यात आला आहे. 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी असे तीन पर्याय या मॉडेलमध्ये आहेत. ग्रॅफाईट, गोल्ड, सिल्व्हर आणि पॅसिफिक ब्लू या रंगात हे मॉडेल उपलब्ध असेल. या मॉडेलसाठी ग्राहकांना 1 लाख 19 हजार 900 रुपये मोजावे लागतील.

आयफोन 12 प्रो मॅक्स

आयफोन 12 प्रोमधील सर्व फिचर्स या मॉडेलमध्ये असणारच आहेत. शिवाय लायडर स्कॅनर (LiDAR Scanner) हे या मॉडेलचं खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या वस्तूचं किंवा खोलीचं स्कॅनिंग करणं यामुळं शक्य होणार आहे. कमी प्रकाशात ऑटो स्कॅनिंग करण्याचे फिचरही या मॉडेलमध्ये असणार आहे. या म़ॉडेलची किंमत  1 लाख 30 हजार रुपये एवढी असेल.

द आयफोन 12

6.1 इंचाची स्क्रीन आणि ओएलईडी (OLED) डिस्प्ले ही या मॉडेलची खासियत. काळा, पांढरा, लाल, हिरवा आणि निळा या पाच रंगात हे म़ॉडेल उपलब्ध असेल. यात बसवण्यात आलेल्या सिक्स कोअर सीपीयुमुळे (6 Core CPU) या मॉडेलचा वेग इतर स्मार्टफोनच्या तुलनेत दुप्पट असेल, असा दावा आयफोननं केला आहे. 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी असे तीन मॉडेल्स बनवण्यात आले आहेत. या मॉडेलची भारतातील किंमत 79,900 रुपये असेल.

आयफोन 12 मिनी

चार मॉडेलपैकी हा सर्वात छोटा आयफोन असेल. याची स्क्रीन असेल 5.42 इंच आकाराची. आकार वगळता द आयफोन 12ची सर्व वैशिष्ट्यं या मॉडेलमध्ये असतील. याची किंमत 69,900 रुपये आहे.