सापडला नवा ‘सुपर-अर्थ’!

खगोलशास्त्रज्ञांनी एका नव्या 'सुपर-अर्थ'चा शोध लावला आहे.हा नवा ग्रह आपल्या 'मिल्की वे' या आकाशगंगेतील सर्वात जुन्या तार्‍यांपैकी एक असलेल्या 'के' नावाच्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालतो.

खगोलशास्त्रज्ञांनी एका नव्या ‘सुपर-अर्थ’चा शोध लावला आहे.हा नवा ग्रह आपल्या ‘मिल्की वे’ या आकाशगंगेतील सर्वात जुन्या तार्‍यांपैकी एक असलेल्या ‘के’ नावाच्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालतो.तो उष्ण आणि कठीण, खडकाळ पृष्ठभागाचा आहे. अर्थातच हा ग्रह आपल्या सौरमंडळाच्या बाहेर असून त्याचा आकार पृथ्वीपेक्षा ५० टक्के अधिक मोठा आहे. तसेच त्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा तिप्पटीने अधिक आहे. अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या बैठकीत याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली. या संशोधनामुळे अंतराळातील अनेक गूढ गोष्टींची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या सुपर अर्थ बाबत ‘द अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल’मध्ये माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ग्रहाला ‘टीओआय-५६१ बी’ असे नाव देण्यात आले आहे. या ग्रहाला आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अवघ्या अर्ध्या दिवसाचा वेळ लागतो. अर्थात त्याचे वर्ष अर्ध्या दिवसाचेच आहे! याचे कारण म्हणजे ग्रहाचे तार्‍यापासूनचे अंतर अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्याच्यावरील तापमान २००० के इतके मोठे आहे

पृथ्वीशिवाय अन्य ग्रहांवर जीवसृष्टीचे अस्तित्व आहे का, याचा दीर्घकाळापासून शोध घेतला जात आहे. त्यासाठी पृथ्वीसद़ृश ग्रहही शोधले जात असतात. काही बाह्यग्रह पृथ्वीपेक्षा मोठ्या आकाराचेही असतात. अशा अनेक ‘सुपरअर्थ’चा आजपर्यंत शोध घेण्यात आला आहे. खडकाळ पृष्ठभाग, तार्‍यापासूनचे योग्य अंतर जेणेकरून ग्रहावरील तापमान पोषक असेल व पाण्याचे अस्तित्व अशा तीन गोष्टींचा जीवसृष्टीच्या शोधासाठी विचार केला जात असतो. आता आपल्या सौरमंडळाबाहेर संशोधकांनी आणखी एका ‘सुपरअर्थ’चा शोध लागणे ही मोठी बाब मानण्यात येत आहे.