भारतातील TikTok पॅरेंट कंपनी Bytedanceचे बँक खाते गोठवले; जाणून घ्या काय आहे गौडबंगाल

भारत सरकारने आता टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्सविरुद्धही (ByteDance) कठोर पावलं उचलली आहेत. टॅक्स चोरीच्या आरोपात सरकारने बाईटडान्सचे भारतातील सर्व खाती गोठवली आहेत.

  नवी दिल्ली : भारतात टिकटॉक (TikTok) बॅन झाल्यानंतर भारत सरकारने आता टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाईटडान्सविरुद्धही (ByteDance) कठोर पावलं उचलली आहेत. टॅक्स चोरीच्या आरोपात सरकारने बाईटडान्सची भारतातील सर्व खाती गोठवली आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. तसेच सरकारच्या निर्णयावर कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय सरकारचा हा आदेश लवकरात लवकर फेटाळण्याची मागणीही केली आहे.

  वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सांगितलं की, सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठे नुकसान झाले आहे. कंपनीने जानेवारीमध्ये भारतात आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. भारतात अद्यापही बाईटडान्सचे 1300 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी अधिकाधिक लोकं परदेशातील ऑपरेशन हाताळत आहेत, ज्यात कंटेंट मॉडरेशनही सामील आहे.

  रॉयटर्सला या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2021 मध्ये बाईटडान्सच्या भारतीय युनिट आणि सिंगापूरमध्ये असलेली बाईटडान्सची पॅरेंट कंपनी TikTok Pvt Ltd मध्ये झालेल्या ऑनलाईन जाहिरात करारामध्ये टॅक्स अधिकाऱ्यांना टॅक्स चोरीची माहिती मिळाली होती.

  त्यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनीच्या Citibank आणि HSBC बँकेतील खाती गोठविण्याचे आदेश दिले होते. यानंतर दोन अधिकाऱ्यांनी, कंपनीला टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबरवरुन लिंक असलेल्या कोणत्याही बँक खात्यामधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे आदेश अधिकाऱ्यांनी दिले.

  खात्यात केवळ 10 मिलियन डॉलर

  बाईटडान्सने या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्याची सुनावणी मुंबई हायकोर्टात होईल. यामध्ये बाईटडान्स इंडियाने असा युक्तिवाद केला आहे की, त्यांच्या खात्यात केवळ 10 मिलियन डॉलर आहे, त्यामुळे अशाप्रकारची स्थगिती कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे आणि ही खाती गोठविल्याने, या स्थगितीमुळे वेतन आणि टॅक्स भरणं कठीण होईल, असं बाईटडान्सने म्हटलं आहे.